पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!Capitol Hill lights up for Diwali festival, celebration starts

पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!

पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेत दिवाळी!
www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकेच्या राजकारणाचं केंद्र असलेल्या कॅपिटॉल हिल्सवर यंदा प्रथमच दिवाळीची आतषबाजी बघायला मिळाली. याबाबत अमेरिकन सिनेट आणि काँग्रेसमध्ये द्विपक्षीय ठराव एकमतानं संमत केल्या नंतर कॅपिटॉल हिल इथं पहिल्यांदाच दिवाळी साजरी करण्याचा कार्यक्रम झाला.

बाराहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकी सदस्य कॅपिटॉल या अमेरिकी काँग्रेसच्या इमारतीत दीपप्रज्वलनासाठी उपस्थित होते. अमेरिकी काँग्रेसमधील भारत समर्थक गटानं आणि भारतीय-अमेरिकी सदस्यांनी त्याचं आयोजन केलं होतं. भारतीय-अमेरिकी समुदायाचा अमेरिकी काँग्रेसमध्ये प्रभाव वाढत आहे, त्यामुळं या वेळी दिवाळीचा सण कॅपिटॉल हिल इथं धुमधडाक्यात साजरा होतोय.

काँग्रेसचे सदस्य जो क्रॉले आणि पीटर रोसकॅम यांनी भारतीय-अमेरिकी समुदायाच्या उपस्थितीत दिवाळी सणानिमित्त कॅपिटॉल हिल इथं कार्यक्रम आयोजित केला होता. भारत-अमेरिका यांच्या मैत्रीवर या वेळी भर देण्यात आला आहे. प्रतिनिधिगृहातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी म्हणाल्या, की दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आलेय.
“अमेरिका भारताची आभारी आहे. कारण आमची नागरी हक्क चळवळ ही भारतातील अहिंसा चळवळीवर आधारित आहे. मार्टिन ल्यूथर किंग यांना तिथंच हे शिक्षण मिळालं आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. तसंच लाखो भारतीय-अमेरिकी लोकांची तिथली उपस्थितीही प्रेरणादायी आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे”, असंही त्या म्हणाल्या.

अमी बेरा हे सध्याच्या काँग्रेसमधील एकमेव भारतीय अमेरिकी असलेले सदस्य म्हणाले, की दिवाळी छान साजरी केली जात आहे. भारतीय-अमेरिकी म्हणून काँग्रेसमध्ये आपण काम करणं अभिमानास्पद वाटतं. दोन्ही देशांतील संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. दिवाळीच्या तिकिटांच्या मोहिमेचा आग्रह धरणाऱ्या काँग्रेसच्या सदस्या कॅरोलिन मॅलोनी यांनी सांगितलं, की अमेरिकी पोस्ट सेवेनं ही विनंती फेटाळल्यानं आपण नाराज आहोत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 31, 2013, 15:53


comments powered by Disqus