देवयानी खोब्रागडे यांना अटक, India`s Deputy Consul General held in US on visa fraud charges

आदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक

आदर्श सोसायटी सदस्य देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क

माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांच्या कन्या आणि वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या सदस्य असलेल्या डॉ. देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आली. नंतर २.५ लाख डॉलर्सच्या हमीपत्रावर त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

भारताच्या वाणिज्य दुतावासात उपकौन्सिल जनरल म्हणून त्या कार्यरत असून त्यांना व्हिसा घोटाळा आणि आर्थिक शोषण केल्याप्रकरणी न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आलीय. देवयानी खोब्रागडे यांनी अमेरिकेतल्या आपल्या घरी एका भारतीयाला अत्यंत कमी पैशात नोकर म्हणून कामाला ठेवलं होतं. या नोकराला अमेरिकेत आणण्यासाठी बनावट कागदपत्रं तयार केल्याचा आणि अत्यल्प पगार नोकराला देऊन आर्थिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

अमेरिकेत नोकरांशी कसं वागावं, त्यांना किती पगार असावा यासाठी विशिष्ट असे नियम आहेत. मात्र डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी त्या नियमांचं उल्लंघन केलं. याप्रकरणी त्या दोषी आढळल्यास त्यांना कमीत कमी पाच वर्षांची तर जास्तीत जास्त १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. डॉ. देवयानी खोब्रागडे यांनी जर्मनी, पाकिस्तान, इटलीमध्ये भारतीय दुतावासात महत्त्वाची पदं सांभाळलीयत.

दरम्यान, नवी दिल्ली येथे भारताच्या परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांना अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांना बोलावून घेऊन अमेरिकेने राजनैतिक अधिकार्‍याला खुलेआम बेड्या घातल्याबद्दल तीव्र नापसंती दर्शविली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 13, 2013, 09:48


comments powered by Disqus