Last Updated: Thursday, June 27, 2013, 10:54
www.24taas.com, झी मीडिया, दोहा कतार हा तसा छोटासाच देश... पण, प्राकृतिक गॅस आणि तेलाची नैसर्गिक वरदान मिळालेला... आणि या वरदानाचा दावेदार राजा अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यानं आपल्या सत्तेची सूत्रं आता आपल्या मुलाकडे सोपवलीत.
आमीर शेख हमद बिन खलिफा यानं कतारच्या राज्यकारभाराची सर्व सूत्रं त्याचा मुलगा शेख तमीम बिन हमद अल थानी याच्याकडे सुपूर्द केलीत. ब्रिटनमध्ये शिकत असलेला अमीर शेखचा मुलगा शेख तमीम याच्या हाती कतारची विशाल धनसंपत्ती आणि गादी सोपवण्यात आलीय. गादी सोडण्याचा विचार त्यांनी या आधीच केला होता पण या विचाराला मूर्त रुप त्यांनी आत्ता दिलंय.
अमीर शेख यांच्या मते आता ही जबाबदारी नव्या पिढीकडे दिली गेली पाहिजे. ‘गेली अठरा वर्षे मी कतारचा संपूर्ण कारभार सांभाळला. आता युवा पिढीचे कर्तव्य आहे त्यांनी हा वारस पुढे चालवावा’ असं अमीर शेख यांनी आपल्या मुलाकडे सूत्रं देताना म्हटलंय.
गेल्या १३० वर्षांपासून कतारमध्ये राजेशाही परंपरा सुरू आहे. ३३ वर्षीय युवराज आता हे पद सांभाळणार आहे. अमीर शेख यांना तीन पत्नी आणि २४ मुले आहेत. कतार हा देश मध्य पूर्व आणि अरब देशांमध्ये सर्वात धनाढ्य देश मानला जातो. कतारचे नाव आणि त्यांची प्रचंड संपत्ती याची चर्चा युरोपीय देशांमध्येही केली जाते.
कतारची लोकसंख्या साधारण २० लाख इतकी आहे. प्राकृतिक गॅस आणि तेलाची निर्यात यांवर या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. एवढा लहान देश असूनही कतारच्या सरकारकडे १०० बिलियन डॉलरपेक्षा ही अधिक संपत्ती आहे. या देशाची मोठमोठ्या प्रकल्पामध्ये ही गुंतवणूक केलेली आहे. तसेच कतारने अनेक देशांना कर्जही दिली आहेत. १९९५ मध्ये अमीर शेख यांनी कतारचा राज्य कारभार सांभाळण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे २०२२ मध्ये होणाऱ्या ‘फिफा वर्ल्डकप’च्या आयोजनात कतारने अमेरिकेलाही मागे टाकलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 27, 2013, 10:53