Last Updated: Wednesday, June 13, 2012, 15:36
www.24taas.com, बंगळुरू बंगळुरूमध्ये भरलेल्या गुगल सायंस फेअरमध्ये अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या १५ जणांपैकी ३ मुलं भारतीय आहेत. भविष्यात जग बदलू शकतील असे प्रयोग करणाऱ्या मुलांसाठी गुगलने ही स्पर्धा आयोजित केली होती.
१६ वर्षीय रोहीत फेन, १७ वर्षीय राघवेंद्र रामचंद्रन या दोन विद्यार्थ्यांनी बंगळुरूमध्येच उंपात् फेरी पार केली. १४ वर्षीय सुमित सिंग याने लखनऊमधून ही फेरी पार करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. गुगल इंडियाचे प्रमुख ललितेश कात्रागडा यांनी वृत्ताला दुजोरा दिला. या अंतिम फेरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये यामिनी नायडू ही मूळची भारतीय असणारी १७ वर्षीय अमेरिकन मुलगीही आहे.
हे तीन भारतीय विद्यार्थी इतर १२ जणांबरोबर जुलैमध्ये अमेरिकेला गुगलच्या मुख्यालयात जाऊन आपला प्रयोग सादर करणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला १,००,००० डॉलर्सची शिष्यवृत्ती मिळणार आहे, तसंच गलापागोस बेटांवर पर्यटनाचीही संधी मिळणार आहे.
रोहितने अर्ध-निर्वातातून ५०% पाणी वाचवण्याऱ्या फ्लशची निर्मिती केली आहे. राघवेंद्रने ऑक्सिडाइझ्ड इंधनांचं पुन्हा उपयुक्त इंधनात रुपांतर करण्याचं तंत्र शोधून काढलं आहे. सुमितने कमी खर्चातील जास्त उत्पादन देणारं उभं शेत निर्माण केलं आहे. यामिनी नायडूने काँप्युटरवर मानवी शरीरासाठी नवं प्रथिन निर्माण केलं आहे.
First Published: Wednesday, June 13, 2012, 15:36