Last Updated: Friday, October 14, 2011, 16:29
झी 24 तास वेब टीम, मुंबई ह्यूंदाईने ‘इऑन’ ही नवी कार बाजारात आणली आहे. मारुतीच्या सर्वाधिक खपाच्या अल्टो समोर पहिल्यांदाच मोठं आव्हान इऑनमुळे उभं ठाकलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उगारल्यापासून मारूतीला अल्टोचे उत्पादन तात्पुरतं थांबवणं भाग पडलं आहे. दरवर्षी दिवाळीत कारच्या मागणीत मोठी वाढ होत असताना संपामुळे मारूती कंपनीकडे कमी साठा शिल्लक राहिला आहे. त्यातच आता अल्टोसमोर इऑनचं आव्हान उभं ठाकल्याने मारुतीची डोकेदुखी वाढली आहे. इऑन मुंबईमध्ये साधारणत: तीन ते सव्वा तीन लाख रुपयांना उपलब्ध होईल. इऑनचे इंजिन 814 सीसीचे आहे तर प्रति लिटर 21.1 किमी इतकं मायलेज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.

ह्यूंदाईने प्रति महिना 10,000 इऑनच्या विक्रीचे लक्ष्य निश्चित केलं आहे. ह्यूंदाईने इऑन हे नवे मॉडेल विकसीत करण्यासाठी तब्बल 900 कोटी रुपये खर्च केले आहेत. इऑनचे स्टायलिंग आणि अद्यावत इंजिनिअरिंगच्या ताकदीमुळे मारुती अल्टोला आपला मार्केटशेअर टिकविणं कठिण जाऊ शकतं. भारतातील एकूण कारच्या विक्रीत एकट्या अल्टोचा हिस्सा 16 टक्के इतका आहे. मारूती अल्टो सप्टेंबर 2000 मध्ये लँच करण्यात आली होती आणि आजवर तब्बल 16 लाख सत्तर हजार अल्टोची विक्री झाली आहे.
मारुती सुझुकीच्या एकूण उलाढालीत तब्बल एक चतृर्थांश हिस्सा अल्टोच्या विक्रीतून मिळतो. मागील वर्षात अल्टोच्या विक्रीत 46 टक्क्यांची वाढ झाली होती आणि एकूण 3 लाख 47 हजार अल्टोची विक्री झाली होती. अल्टोची सरासरी मासिक विक्री 32,000 युनिटसची आहे. त्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ह्यूंदाईच्या सँट्रोच्या 34,286 युनिटस विक्री झाली आहे.
First Published: Friday, October 14, 2011, 16:29