Last Updated: Monday, January 16, 2012, 21:49
www.24taas.com, इस्लामाबाद 
पाकिस्तानमध्ये मेमोगेट प्रकरण आणि झरदारींवरील घोटाळ्यांच्या आरोपांबाबत कारवाई न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं गिलानींना अवमानाची नोटीस बजावलीय. तसंच 19 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येतोय.
सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावल्यानंतर पाकिस्तान सरकारनं लगेचच कोर्टात माफिनामा सादर केलाय. तसंच कायदामंत्र्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार असल्याची ग्वाही दिलीय. कोर्टानं अवमानाची नोटीस बजावल्यानंतर लगेचच गिलानी यांनी कायदा मंत्र्यांशी चर्चा केली. कोर्टाच्या अवमानाची नोटीस बजावलेले गिलानी हे पाकिस्तानातील दुसरे पंतप्रधान आहेत. कोर्टाच्या आजच्या आदेशामुळं पाकिस्तानात राजकीय वादळ घोंगावत असल्याची चिन्ह दिसत आहेत.
कोर्टाच्या निर्णयाचा पाक लष्कर आदर करेल असं स्पष्टीकरण यापूर्वीच लष्कर प्रमुख अश्फाक कयानी यांनी दिलं आहे. त्यामुळं मेमोगेट प्रकरणी कोर्टाच्या सुनावणीकडं पाकचं बारीक लक्ष आहे. आता 19 जानेवारीला कोर्ट काय निर्णय देणार यावर पुढील राजकीय हालचालींची दिशा ठरणार आहे.
First Published: Monday, January 16, 2012, 21:49