झरदारींची कामगिरी उजवी- स्टीफन कोहेन - Marathi News 24taas.com

झरदारींची कामगिरी उजवी- स्टीफन कोहेन

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
दहशतवादाच्या भस्मासूराने थैमान घातलेल्या पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली जरदारी यांची कामगिरी आजवरच्या सरकारांमध्ये तुलनेत उजवी ठरली आहे असं मत एका अमेरिकन तज्ञाने व्यक्त केलं. असिफ अली झरदारींनी कमकुवत झालेल्या घटनात्मक संस्थांच्या पुर्नउभारणीचे प्रयत्न केल्याचंही मत या तज्ञाने व्यक्त केलं.
 
पाकिस्तानातील विरोधी पक्ष आणि गुप्तचर संघटना राष्ट्राध्यक्ष भ्रष्ट असल्याची प्रतिमा रंगवण्याचे पध्दतशीर प्रयत्न करत असले तरी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. पाकिस्तानमध्ये आजवर अधिक काळ लष्करशहांच्या राजवटीचा अंमल राहिला आहे. झरदारींकडे जरी त्यांच्या पत्नी बेनझीर भूत्तोंचा करिम्षा आणि बुध्दीमत्ता नसली तरी ते बेनझीर भूत्तोंचा सुधारणेचाच अजेंडा राबवत असल्याचं मत स्टीफन कोहेन यांनी व्यक्त केलं. भारतीय उपखंडावरील ज्येष्ठ तज्ञ अशी स्टीफन कोहेन यांची प्रतिमा आहे.
 
पाकिस्तनात सातत्याने होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी तिथल्या जनतेचे लक्ष सेनादलांच्या हिंसाचार रोखण्याच्या असमर्थतेकडे अधिक केंद्रित झालं आहे. त्यामुळेच झरदारींच्या विरुध्द असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी २०११ मध्ये कमी झाल्या आहेत असं कोहेन यांनी लिहिलं आहे.
 
'द फ्युचर ऑफ पाकिस्तान' या कोहेन यांच्या पुस्तकात पाकिस्तानातील नव्या सरकारचे मुल्यमापन करण्यात आलं आहे. झरदारी यांच्या तीन वर्षाच्या राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळात पाकिस्तानातील घटनात्मक व्यवस्थेत लक्षणीय बदल झाल्याचं तसंच कमकुवत झालेल्या लोकशाही संस्थांच्या पुर्नबांधणीचे प्रयत्न होत असल्याचं निरीक्षणही कोहेन यांनी नोंदवलं आहे.

First Published: Friday, November 25, 2011, 14:15


comments powered by Disqus