न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप, us court dismisses devyani khobragades indictment in vi

न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप

न्यूयॉर्क कोर्टानं फेटाळले देवयानीवरचे आरोप
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारताच्या अमेरिकेतल्या माजी अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना दिलासा मिळालाय. अमेरिकेच्या न्यूयॉर्क कोर्टाने देवयानी यांच्यावरील आरोप रद्द केलेत. देवयानी खोब्रागडे यांच्यावर बनावट व्हिसा प्रकरणी आरोप करण्यात आले होते. मात्र, न्यूयॉर्क कोर्टाने हे आरोप फेटाळल्यामुळे भारताच्या राजनैतिक दबावाचा विजय झालाय. देवयानीचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केलाय.

देवयानी खोब्रागडे यांच्या विरोधात अमेरिकेच्या कोर्टात सुरू असलेला खटला फेडरल कोर्टाने रद्द केला आहे. व्हिसा घोटाळा केल्याचा आरोप ठेवून न्यूयॉर्क पोलिसांनी देवयानी यांना अटक केली होती. अमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित आरोपींच्या समोर देवयानी यांची अपमानास्पद पद्धतीने अंगझडती घेण्यात आली होती.

न्यायालयानं निर्णय देताना देवयानीवर ९ जानेवारी रोजी लेखी आरोपपत्राचा तपशील आला तेव्हा त्यांना पूर्ण राजनैतिक सूट प्राप्त असल्याची सूट होती, असं म्हटलंय. देवयानीला ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी परदेश विभागाकडून राजनैतिक सूट प्राप्त झाली होती. ९ जानेवारी रोजी भारतात पोहचेपर्यंत देवयानीला ही सूट मिळालेली होती, असं न्यायालयानं म्हटलंय.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, देवयानीला अटक करण्यात आली तेव्हा किंवा आत्ताही राजनैतिक सूट उपलब्ध नाही. दुसऱ्यांदा आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर ९ जानेवारी रोजी देवयानी न्यायालयासमोर उपस्थित राहिली आणि प्रकरण संपुष्टात आणण्याची विनंती केली.

देवयानीच्या जामीनाच्या अटी आणि मुचलका रद्द करण्यात यावा, तसंच या आरोपांच्या आधारे दिले गेलेले अटक वॉरंटही रद्द केले जावेत, असेही आदेश न्यायालयानं दिलेत.

३९ वर्षीय देवयानी खोब्रागडे यांना गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी व्हिजामध्ये छेडछाड आणि नोकर संगीता रिचर्ड हिच्या व्हिजासंबंधी चुकीची माहिती देण्यासाठी अटक करण्यात आली होती. तसंच कपडे काढून त्यांची तपासणी करण्यात आली होती. तसंच त्यांना गुन्हेगारांसोबत ठेवण्यात आलं होतं.

या प्रकरणामुळे भारत आणि अमेरिकेतले संबंध ताणले गेले होते.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 11:22


comments powered by Disqus