Last Updated: Monday, May 12, 2014, 12:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई महाराष्ट्रात 84 व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी एकूण 812 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय. ज्यामध्ये, एकट्या केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे आणि त्यांच्या आमदार मुलीसाठी 52 पोलीस तैनात असल्याची माहिती समोर आलीय. एका ‘आरटीआय’ अर्जाच्या उत्तरात हा धक्कादायक खुलासा झालाय.
पुण्याचे रहिवासी असलेले आरटीआय कार्येकर्ते विहार धुर्वे यांच्यावतीनं दाखल करण्यात आलेल्या एका आरटीआय अर्जात ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. महाराष्ट्रात राजकारणी आणि राजकारणाव्यतिरिक्त व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी एकूण किती पोलीस आणि सुरक्षा अधिकारी तैनात आहेत? असा प्रश्न या याचिकेत विचारला गेला होता.
केंद्रीय गृहमंत्री शिंदे आणि त्यांची मुलगी प्रणिती यांना झेड प्लस सुरक्षा दिली गेलीय आणि जवळपास 52 सुरक्षा अधिकारी त्यांच्यासाठी तैनात करण्यात आलेत. तर केंद्रीय गृह मंत्र्यांची पत्नी उज्ज्वला शिंदे यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली गेलीय. त्यांच्यासाठी 14 सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आलेत.
दरम्यान, याबद्दल प्रणिती यांना संपर्क साधला असता आपल्या कुटुंबाला देण्यात आलेली सुरक्षेची ‘अनावश्यक’ असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच आपली सुरक्षा हटवण्यात यावं असंदेखील त्यांनी म्हटलंय.
‘प्रोटोकॉलनुसार सुरक्षा उपलब्ध करून दिली जाते. परंतु, आम्ही स्वत: कधीही कोणत्याही प्रकारची सुरक्षा मागितलेली नाही. तर आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या सुरक्षेचा आम्ही वापरदेखील करत नाही’ असंही प्रणिती यांनी म्हटलंय. मी राज्याचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आमची सुरक्षा हटवण्याची मागणी केलीय. योग्य गोष्टीसाठी याचा वापर व्हावा, असं आम्हाला वाटतं अशी पुस्तीही प्रणिती यांनी जोडलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 12, 2014, 12:01