Last Updated: Wednesday, May 23, 2012, 18:16
www.24taas.com, बीड संशयित स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी परळीतील डॉ. सुदाम मुंडे आणि त्याच्या पत्नीवर पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल केले आहेत. एव्हढंच नाही तर मुंडे दांपत्याला पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलंय.
मृत महिलेचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मुंडे दाम्पंत्यावर गुन्हा दाखल करून त्यांना फरार घोषित केलंय. त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून मयत महिलेच्या पतीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राजकीय वरदहस्त असलेल्या सुदाम मुंडेच्या हॉस्पिटलमधील दुष्कृत्यांचा पर्दाफाश 'झी 24 तास'नं केल्यानंतर, तो आता पुरता अडचणीत सापडला आहे.
आता सरकारनं मुंडेच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरु केलाय. मुंडे हॉस्पिटलला आरोग्य मंत्रालयाची नोटीस पाठवण्यात आली असून, मुंडे हॉस्पिटलच्या चौकशासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंडे हॉस्पिटलची चौकशी केली. या चौकशी अहवालात हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी, अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलीय. आता हॉस्पिटल सील करण्याबाबत आणि मुंडे याचा परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी उद्या (गुरूवारी) घेणार आहेत. तर डॉ. मुंडे याचा जामीन अर्ज रद्द व्हावा, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक गौरी राठोड यांनी सेशन्स कोर्टात अर्ज दाखल केलाय. त्यावर २५ मे रोजी निर्णय होणार आहे. या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या सर्व सोनोग्राफी सेंटरच्या तपासणीचे आदेश देण्यात आलेत. त्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय.
First Published: Wednesday, May 23, 2012, 18:16