Last Updated: Thursday, June 21, 2012, 11:43
www.24taas.com, सातारा पंढरीच्या वारीमध्ये आज रिंगण सोहळ्यांची पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंदवरून पंढरपूरकडे मार्गस्थ झालीय. तरडगावजवळ ‘चांदोबाचा लिंब’ इथं माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण रंगणार आहे.
बुधवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातला गोल रिंगण सोहळा बेलवंडीत रंगला. टाळकरी, विणेकरी, तुलसीवृंदावन घेतलेल्या स्त्रिया, तुकोबांच्या पालखीचा अश्व असा आनंद सोहळा वारक-यांनी याची देही याची डोळा अनुभवला.
रिंगण म्हणजे वारी सोहळ्यातील विसावा... वारीचा प्रवास अधिक सुखकारक आणि आनंदी व्हावा यासाठी रिंगणाचं आयोजन केलं जातं. वारकरी वेगवेगळे खेळ खेळून, विठूनामाचा जयघोष करत या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतात. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आज अंथरुण इथं असणार आहे. तर दुसरीकडे संत एकनाथ महाराजांची पालखी दांडेगाव मुक्कामानंतर पंढरीकडे मार्गस्थ होईल.
दरम्यान, संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात दाखल झालाय. यावेळी पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. कर्जतमध्ये विश्रांती घेऊन पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पंढरीच्या वाटेवर केवळ विठ्ठलाची आस असल्याचं वारक-यांचं म्हणणं आहे. मोठ्या उत्साहात दिंडीचा पंढरीच्या दिशेनं प्रवास सुरु आहे. नगरमध्ये पालखीला संरक्षण मिळालं नसल्याची खंत दिंडीप्रमुख मोहन महाराज ढोलापूरकर यांनी व्यक्त केली.
.
First Published: Thursday, June 21, 2012, 11:43