पावसाच्या दडीने होणार उत्पादनावर परिणाम - Marathi News 24taas.com

पावसाच्या दडीने होणार उत्पादनावर परिणाम

www.24taas.com, मुंबई
 
मान्सूननं दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत आहे. जुलैमध्ये पाऊस झाला तर ठीक. अन्यथा अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आणि सरकारच्या नजराही आकाशाकडे लागल्या आहेत.
 
महाराष्ट्रासह देशालाच अशा पावसाची प्रतीक्षा आहे. आकाशाकडे डोळे लावून शेतकरी वरुणराजाची वाट पाहतायत.  देशात १  जून ते २०  जूनपर्यंत ६७.४  मिलीमीटर पाऊस झाला आहे. जो या कालावधीत सरासरी ९०.६० मिलीमीटर इतका असतो. याचा अर्थ सरळ आहे यावर्षी पाऊस २२ मिलीमीटर कमी झाला.  महाराष्ट्रात गेल्यावर्षी जूनमध्ये सरासरी ९२ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी तो ६७ टक्केच झालाय, म्हणजे तो २५ टक्के कमी झालाय. असंच चित्रं राहिलं तर परिस्थिती गंभीर होईल आणि १५ जुलैपर्यंत पाऊस झाला नाही तर कमी पाण्यावरची पिकं घेण्यावर भर द्यावा लागेल. महाराष्ट्रात तर आतापर्यंत केवळ ८ टक्के पेरण्या झाल्यात आणि जिथं झाल्यात तिथंही पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट आहे.
 
मान्सूननं देशभरात शेतक-यांची आणि सरकारचीही चिंता वाढवलीय.... पुरेशा पावसाअभावी अन्नधान्याचं उत्पादन घटण्याची भीती असते. गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यानं अन्नधान्याचं २५२.५६ दशलक्षटन रेकॉर्डब्रेक उत्पादन झालं होतं. यावर्षी हवामान खात्यानं आधी ९९  टक्के मान्सूनचं भाकीत केलं, नंतर ९६ टक्क्यांचा अंदाज वर्तवला. कमी पावसानं सरकारची चिंता वाढलीय. दरम्यान,  केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के. व्ही. थॉमस यांनी दिलासा दिलाय. ते म्हणालेत घाबरण्याचं तसं कारण नाही. गेल्या वर्षी अन्नधान्याचं बंपर उत्पादन झालं होतं. त्यामुळे गोदामात विक्रमी साठा आहे.
 
देशातल्या ४० टक्के शेतीला सिंचनाची सुविधा आहे. याचाच दुसरा अर्थ असा देशातली ६० टक्के शेती मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सूननं दगा दिलाच तर एप्रिलपासून घेतली जाणारी धान, डाळ, तीळ ही पिकं उशिरा होतील आणि खरीप हंगाम हातातून गेला तर आधीच वाढलेल्या महागाईत आणखी भर पडेल.

First Published: Monday, July 2, 2012, 19:30


comments powered by Disqus