Last Updated: Friday, July 6, 2012, 14:38
www.24taas.com, कोल्हापूर ‘अगोदर स्वत:ला दलित म्हणायचं बंद करा!’ असा सल्ला दिलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... तेही दलित महासंघाच्या मेळाव्यातच...
गुरुवारी कोल्हापुरात दलित महासंघाच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त भरलेल्या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी दादांनी ‘दलित’ या शब्दाबद्दल त्यांना वाटत असेलली चीड व्यक्त केली. दलित या शब्दाला सुप्रीम कोर्टाची बंदी आहे. हा शब्दच मुळात अवमानकारक असल्यानं तो तुम्ही स्वत: तो म्हणायचा बंद करा... आणि हा शब्दच व्यवहारातून काढून टाका... सतत आठवण करून कशाला जखमेची खपली काढता? असा प्रश्नच अजित पवारांनी उपस्थितांना विचारला.
शिपाई म्हणून कामाला लावण्यासाठी शिफारस करण्यापेक्षा स्वत: अधिकारी व्हा... सत्तेत सामील व्हा... गरिब म्हणून तुम्हाला शिक्षणापासून कुणीही वंचित ठेवू शकणार नाही, असं दलित जनतेला सांगतानाच त्यांनी जातीभेदावर परखड टीका केली. दलित चळवळीचाही त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. नेते अधिक आणि कार्यकर्ते कमी अशी अवस्था झाल्याने मागासवर्गीय चळवळीची वाताहत होत आहे, असं अजित पवारांनी दलित नेत्यांना सुनावलंय.
First Published: Friday, July 6, 2012, 14:38