आमदारांना काहीही काम नसतं... - Marathi News 24taas.com

आमदारांना काहीही काम नसतं...

www.24taas.com, मुंबई
 
आमदारांना काहीही काम नसतं अशी धक्कादायक आणि चमत्कारिक माहिती विधिमंडळानं दिली आहे.  नागपुरातल्या एका आरटीआय कार्यकर्त्यानं माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवर हे उत्तर देण्यात आलयं. विधिमंडळाच्या या उत्तरामुळं नागरिक आणि आमदारांनी नाराजी व्य़क्त केली आहे.
 
 
तुम्ही मतदान करुन निवडून दिलेल्या आमदाराचं काम आणि कर्तव्य काय ? असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारला तर.. सरकारचं उत्तर असेल काहीही नाही.... होय चमत्कारिक असलं तरी हे उत्तर खरं आहे. आमदारांची हक्क आणि कर्तव्य काहीही नाहीत असं अजब उत्तर विधिमंडळानं दिलयं. नागपुरातल्या एका आरटीआय कार्यकर्त्यानं माहितीच्या अधिकारात माहिती मागवली त्यामध्ये हे उत्तर देण्यात आलयं.
 
 
राज्याची ध्येय धोरणं आमदार ठरवतात. त्याचबरोबर विधानसभा आणि विधानपरिषदेच्या माध्यमातून कायदे आणि नियम बनवण्याची जबाबदारी आमदारांवर असते. चर्चेच्या माध्यमातून आमदार अनेक महत्वाची विधेयक मंजूर करुन घेतात. सर्वसामान्य जनतेचे विधिमंडळात नेतृत्व करतात. त्यामुळं विधिमंडळानं दिलेल्या उत्तरावर आमदारांनी नाराजी व्यक्त केलीये. विधिमंडळानं दिलेलं उत्तर अगदीच ठोकळेबाज आणि निराशाजनक आहे. त्यामुळं विधिमंडळानं आमदारांची कामं आणि कर्तव्य निश्चित करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
 
 

First Published: Saturday, March 31, 2012, 15:41


comments powered by Disqus