स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी - Marathi News 24taas.com

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
राज्यात लवकरच 10 महापालिका, 27 जिल्हा परिषद, 309 पंचायत समित्या आणि 198 नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.  त्यासंदर्भात विचार करण्यासाठी आयोजीत करण्यात आलेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक संपली.  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवणार. दोन्ही पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा. येत्या बुधवारी होणार औपचारिक घोषणा.
 
भाजपा शिवसेना आणि रामदास आठवलेंची रिपाईने काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर कडवं आव्हान उभं केलं आहे. नुकत्याच झालेल्या खडकवासला पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभवाचा झटका बसला. खडकवासल्याची पोटनिवडणुक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिष्ठेची केली होती. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. पण हर्षदा वांजळेंना भाजपाच्या भीमराव तापकीरांकडून पराभवाचा सामना करावा लागला.
 
तसंच गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांचे उस आणि कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून सुरु झालेल्या आंदोलनाने तीव्र स्वरुप धारण केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारची पाचावर धारण बसली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टींनी थेट पवारांच्या बारामतीतच उपोषण करुन सरकारला जेरीस आणलं. मनसेनेही शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याआधी अण्णा हजारेंच्या आंदोलनाने केंद्र सरकारच्या तोंडाला फेस आणला होता.या पार्श्वभूमीवर मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी केली नाही तर पानीपत निश्चितच होईल हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चांगलचं माहित आहे. त्यामुळेच येत्या निवडणुकांना एकत्र सामोरं जाण्याचा निर्णय झाला आहे.

First Published: Saturday, November 19, 2011, 16:43


comments powered by Disqus