'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही' - Marathi News 24taas.com

'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही'

www.24taas.com, मुंबई
 
मुंबई महापालिका निवडणुकांत उमेदवारी अर्ज भरतानाच सर्व पक्षांना बंडखोरीनं ग्रासल आहे. मात्र रामदास आठवलेंच्या रिपब्लीकन पक्षाला निवडणूकीनंतरच्या बंडाची भिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर कुणी पक्षांतर करू नये यासाठी तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं पक्षनेतृत्वानं ठरवलं आहे. यापुर्वी देखील अनेकदा रिपब्लीकन पक्षाला असे झटके बसल्यानं असा निर्णय यावेळी पक्षनेतृत्वानं घेतला असावा.
 
रिपब्लीकन ऐक्याची प्रक्रिया घडत असतानाच १९९० मध्ये आठवलेंचे त्याकाळचे कट्टर समर्थक टी. एम. कांबळे विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून  आल्यावर आठवलेंपासून दूर जात त्यांनी आपला पक्ष स्थापन केला. नंतर आरपीआयचे चंद्रकांत हंडोरे महापौर झाल्यावर अनेक पक्षांना वळसा घालत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश मिळवला.
 
१९९९ ते २००४ दरम्यान राष्ट्रवादीसोबत युती केल्यावर राज्यमंत्री करण्यात आलेल्या गंगाधर गाडेंनी राष्ट्रवादीपासून फारकत घेतली तर मागील मुंबई पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सुजाता वाघमारे आणि गौतम साबळेंनी देखील काँग्रेसची वाट धरली होती. मागील हा सर्व अनुभव पाहता आता 'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही' असं प्रतिज्ञापत्रच लिहून घेण्यात येणार आहे
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 12:14


comments powered by Disqus