Last Updated: Monday, February 20, 2012, 14:31
www.24taas.com, ठाणे 
ठाणे महापालिकेच्या नगरसेवक अपहरणनाट्याचा पर्दाफाश झाला आहे. बसपचे नगरसेवक विलास कांबळे हेच पोलिसांसमोर हजर झाले आणि आपलं अपहरण झालं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळं शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंवरील गुन्हा मागे घेण्यात आला आहे.
बसपाचे दोन नगरसेवक विलास कांबळे आणि सुशीला यादव यांचं अपहरण शिवसेना आमदार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याची तक्रार बसपाचे सचिव राज चव्हाण यांनी दाखल केली होती. त्याबाबतचा गुन्हा काल नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळं ठाण्यात पोलीस स्टेशनसमोर शेकडो शिवसैनिक रात्री उशीरापर्यंत जमले होते.
मात्र, स्वतः विलास कांबळे पोलिसांसमोर हजर झाल्यानं या अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला आहे. देवदर्शनासाठी आपण गेल्याचा खुलासा कांबळे यांनी केला. तर याप्रकरणी आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे. बसपाचे प्रभारी सुनील खांबे यांनी हा सगळा राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं आहे. बसपाचे प्रदेश सचिव राज चव्हाण यांनी ही स्टंटबाजी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर या सगळ्या षडयंत्रामागे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड असण्याची शक्यता शिंदेंनी व्यक्त केली आहे.
First Published: Monday, February 20, 2012, 14:31