Last Updated: Monday, October 21, 2013, 00:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एकतर्फी प्रेमातून एका तरूणाने तरूणीला जबरदस्तीने अॅसिड पाजल्याची घटना बोरिवलीच्या गोराई बीच परिसरात घडलीय. संशयीत आरोपी जितेंद्र सकपाळला पोलिसांनी अटक केलीय. पीडित तरुणीची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती मिळतेय.
अॅसिड हल्ल्याने मुंबई पुन्हा एकदा हादरलीय. जितेंद्र सकपाळ या तरुणानं पीडित तरुणीला जबरदस्तीनं अॅसिड पाजलं. तिने विरोध केला तर त्याने तिच्या चेहऱ्यावरही अॅसिड फेकलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतून घरी परतणाऱ्या या मुलीला आरोपी तरुण बळजबरीनं गोराई बीचवर घेऊन गेला. तिथे त्यानं हे भयानक कृत्य केलं. अॅसिड पाजणारा हा नराधम आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तो हॉटेल मॅनेजमेंटचा विद्यार्थी आहे. मुलीवर उपचार सुरु असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश पाटील यांनी दिलीय.
दोघे गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो आमच्या मुलीला त्रास द्यायला लागला, तिला मारहाण करु लागला आणि म्हणूनच त्याच्याविरुद्ध दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही केली होती. पण, लोकांच्या सांगण्यावरुन ती तक्रार मागे घेण्यात आली होती, असं मुलीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
तर, पीडित मुलीने स्वत:च अॅसिड पिण्याचा प्रयत्न केला आणि आरोप मात्र मुलावर करण्यात येतोय, असा बचाव आरोपी जितेंद्रच्या कुटुंबीयांनी केलाय. तपासाअंती खरं काय - खोटं काय हे समोर येईलच... पण, आणखी किती अॅसिड हल्ले झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा भळभळून समोर आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 21, 2013, 00:09