महायुतीत मनसे हवा, युतीबाबत भाजप उत्सुक, Add to MNS MahaYuti - Devendra Fadnavis

महायुतीत मनसे हवा, युतीबाबत भाजप उत्सुक

महायुतीत मनसे हवा, युतीबाबत भाजप उत्सुक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

भारतीय जनता पक्षाने पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुत जमविण्याचा प्रयत्न केलाय. नवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. सत्ता काबिज करायची असेल तर मनसेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे फडणवीस म्हणालेत.

भाजप, शिवसेना आणि आठवले यांच्या रिपाई या महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाला नाही तरी सत्तेचे गणित जमेल. मात्र, हे गणित अधिक सोपे होण्यासाठी मनसे येणे गरजेचे आहे. मनसे आल्यास हे गणित सोपे होईल, असा दावा फडणवीस यांनी केलाय. ते एका मराठी वृत्तपत्राशी बोलत होते.

राज्यात आगामी निवडणुका जिंकण्यासाठी युतीची तयारी सुरुच आहे. महायुतीमधील तीनही पक्षांची संमती असेल, तरच युतीमध्ये चौथ्याचा समावेश होईल. हा चौथा मनसे असेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केलेय. त्यामुळे मनसेशी युती करण्याबाबत भाजप उत्सुक असल्याचे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत.

शिवसेना-भाजप रिपाईं युतीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसेच्या समावेशाच्या मुद्दावर गेले काही महिने चर्चा सुरू आहे. युतीमध्ये मनसेचा समावेश का आवश्यक वाटतो, यावरही बोलताना हे भाष्य केलं. केवळ ३७ टक्के मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. राज्यातील ६३ टक्के जनतेची मते काँग्रेस आघाडीच्या विरोधात आहेत, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत मनसेमुळे होणारी मतविभागणी टाळण्यासाठी केवळ युती हा एकमेव पर्याय नाही, अन्य पर्यायही उपलब्ध आहेत. मनसे हा शिवसेनेतून बाहेर पडलेला पक्ष असून सुरुवातीला त्यांनी युतीची मते घेतली. शिवसेनेत असताना उध्दव आणि राज ठाकरे या दोघांशीही आमचे मैत्रीचे संबंध होते. राज ठाकरे सेनेबाहेर पडले, तरी हे संबंध एका दिवसात संपतील असे नाही, असे सांगत मनसेला युतीत घेतले पाहिजे यावर त्यांनी जोर दिला.

निवडणुकीतील मतांचे गणित शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रिपब्लिकन नेते यांना समजावून सांगितलेय. राज ठाकरे यांच्यापर्यंतही योग्यप्रकारे पोचविले आहे. सर्वाची एकमेकांविषयी असलेली मते आणि भूमिका भाजपला आता कळून चुकल्या आहेत. खरे तर अजून वेळच आलेली नाही, असे सांगत, राजकीय गणित जमविणे किती अवघड असल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 20, 2013, 17:56


comments powered by Disqus