Last Updated: Saturday, August 10, 2013, 21:53
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची बोलणी सुरु होण्याआधीच रस्सीखेच सुरू झालीय. प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या दक्षिण मध्य मुंबईसाठी शिवसेनेनं उमेदवाराची चाचपणी सुरु करताच रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियानं या जागेवर दावा ठोकलाय.
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांक़डून दिल्या जात असलेल्या या निव्वळ घोषणा नाहीत, तर ही अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत शिवसेना, भाजप स्वतंत्रपणे कामाला लागलीय. अशात रिपाइं एकाकी पडलीय. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत दक्षिण मध्य मुंबई मतदार संघासाठी शिवसेनेकडून उमेदवाराच्या चाचपणीची बातमी कळताच रामदास आठवलेंची घालमेल सुरू झालीय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत "मातोश्री"वरील बैठकीत दक्षिण मध्य मुंबईसाठी माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या नावावर चर्चा झाली. जोशी सरांनीही या मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचं सांगितंलय.
तसा तर या मतदार संघाचा अनुभव रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनाही आहे. तेही या मतदारसंघातून एकदा खासदार म्हणून संसदेत गेलेत...त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत रिपाईच्या वाटेला यावा असा त्यांचा दावा आहे. दक्षिण मध्य मुंबई प्रमाणेच आठवलेंना कल्याण, लातूर, रामटेक आणि पुणेही हवंय. मात्र ही मागणी करताना आपल्याला नेमकं काय साध्य करुन घ्यायचं हे त्यांना आधी मनाशी नक्की करावं लागेल. नाहीतर निवडणुकींनंतर आठवलेंच्या हाती केवळ धुपाटणेच उरेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 21:52