Last Updated: Thursday, December 6, 2012, 07:48
www.24taas.com, मुंबई भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबई महापालिकेनं जोरदार तयारी केलीय. चैत्यभूमी ते दादर चौपाटीपर्यंत विविध नागरी सुविधा पुरवल्या गेल्यात. हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय दादरमध्ये जमा झाल्याचं चित्र सध्या दिसून येतंय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनासाठी हजारो अनुयायी मुंबईत येतात. या जनसमुदायासाठी मुंबई महापालिकेनं चैत्यभूमी ते दादर चौपाटीपर्यंत नागरी सुविधा पुरवल्या गेल्यात. त्यात २५० स्नानगृहं, ५० आरोग्य चिकित्सा केंद्र, ४५० स्टॉल्स आणि ३५० नळांची व्यवस्था शिवाजी पार्कात पुरविण्यात आलीय. तसंच अनुयायांना राहण्यासाठी १ लाख ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरतं निवारा केंद्रही उभारण्यात आलंय. बेस्टनंही आंबेडकर अनुयायांची विशेष काळजी घेतली असून ४९ मार्गांवर विशेष बससेवा सुरू ठेवली आहे. नागरी सुविधांसह महापालिकेनं सुरक्षेचीही जय्यत तयारी केलीय, अशी माहिती मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी दिलीय.
डॉ. आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि आंबेडकर स्मारकासाठी सरकारनं नुकतीच केलेली इंदू मिलच्या हस्तांतरणाची घोषणा या पार्श्वभूमीवर लाखो अनुयायी मुंबईत येतील. त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी पूर्ण खबरदारी प्रशासनानं घेतलीय.
First Published: Thursday, December 6, 2012, 07:48