महालक्ष्मी रेसकोर्स आता मुंबईकरांसाठी मोकळा! BMC to possess Mahalakshmi Racecourse!

महालक्ष्मी रेसकोर्स आता मुंबईकरांसाठी मोकळा!

महालक्ष्मी रेसकोर्स आता मुंबईकरांसाठी मोकळा!
www.24taas.com, मुंबई

मुंबईतला महालक्ष्मी रेसकोर्सचा 99 वर्षांचा भाडेपट्टीचा करार 31 मे रोजी संपणार असल्यानं रेसकोर्सची जमीन बीएमसीनं ताब्यात घेण्याची मागणी महापौरांनी प्रशासनाकडं केली आहे. सव्वा दोनशे एकरांवर पसरलेल्या रेसकोर्सच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे गार्डन व्हावं. अशी इच्छाही महापौरांनी व्यक्त केलीय.

सव्वा दोनशे एकर परिसरात पसरलेला मुंबईतील हा महालक्ष्मी रेसकोर्स सामान्य लोक फक्त हिंदी चित्रपटांमध्येच पाहत आलेत. जर मुंबईच्या महापौरांच्या इच्छेप्रमाणं सर्व सुरळीत पार पडले तर सामान्य मुंबईकरही या रेसकोर्सच्या जागेत मनसोक्त फिरु शकणार आहे. 99 वर्षांच्या करारावर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला ही जागा बीएमसीनं दिलीय. ज्याची मुदत 31 मे रोजी संपणार आहे. त्यामुळं ही जागा ताब्यात घेऊन याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क उभारण्याची कल्पना महापौरांनी मांडली आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स 1883 मध्ये बांधण्यात आला. यासाठी सर कुस्रो वाडिया यांनी जमीन दान केली. बीएमसीच्या मालकीचा असलेला हा रेसकोर्स 1914 मध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला 99 वर्षांच्या भाडेपट्टी करारावर देण्यात आला. ज्याची मुदत 31 मे रोजी संपणार आहे. सव्वा दोनशे एकर परिसरात पसरलेल्या या जागेची बाजारभावानुसार किंमत सुमारे 15 हजार कोटी रुपये होते.


मोजक्या उच्चभ्रू लोकांच्या मौजमजेसाठी चालणा-या घोड्यांच्या शर्यती आणि त्यावर चालणारी बेटींग. एवढ्यापुरता मर्यादित वापर आतापर्यंत रेसकोर्सचा होत आलाय. बीएमसी प्रशासनानं ही जागा ताब्यात घेऊन त्याचा विकास केल्यास ही बाब सामान्य मुंबईकरांच्या मनाला भावणारी अशीच आहे.

First Published: Sunday, May 5, 2013, 17:36


comments powered by Disqus