Last Updated: Wednesday, May 8, 2013, 08:32
www.24taas.com, मुंबई रेल्वेत पदोन्नती मिळावी यासाठी ९० लाख रुपये लाच देणाऱ्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार प्रकरणात सीबीआयनं पुन्हा एकदा धाड सत्र सुरु केलंय.
३ मे रोजी रात्री सीबीआयनं महेश कुमार यांना मुंबई विमानतळावरून अटक केल्यानंतर महेश कुमार यांची पत्नी अंजली, रेल्वे सुरक्षा बलचे अधिकारी महिम स्वामी आणि स्वामीची पत्नी या तिघांनी महेश कुमार यांच्या शासकिय निवास स्थानावरुन काही बॅगा आणि दागिने लंपास केले होते. त्या बॅगा आणि दागिने सीबीआयनं महिम स्वामीच्या भाईंदरमधील घरावर छापा टाकून हस्तगत केल्या आहेत. या बॅगांमध्ये कोट्यावधी रुपयांचे जमीन खरेदी केल्याचे कागदपत्र आणि जवळपास ५० लाख रुपयांचे राष्ट्रीय बचत पत्र, कर्नाटक, द्वारका आणि नोएडा इथं एकूण सात ते आठ कोटी किंमतीची घरं असल्याची कागदपत्रं मिळालीत. दोन लाख रुपयांचे आंतरराष्ट्रीय गीफ्ट व्हाऊचर्स, ३५० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, लहान लहान डब्यांमध्ये कोट्यावधींचे हिरे, आणि २००४ सालचे २५ कोरे स्टँपपेपर सापडलेत.
विशेष म्हणजे महेश कुमार यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बेनामी संपत्ती असून त्यांची पत्नी आणि दोन मुलं यांच्याही नावावर मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती असल्याचं सीबीआय तपासात समोर आलंय. या शिवाय महेश कुमार आणि त्यांच्या परिवाराच्या बँक खात्यांची माहितीही साबीआयला मिळालीय. या खात्यांची अधिक तपासणी सीबीआय करतंय.
First Published: Wednesday, May 8, 2013, 08:32