मुंबईमध्ये एसटीची फेरी, नवी 'कॉर्पोरेट शिवनेरी`! Corporate Shivneri Bus for Mumbai

मुंबईमध्ये एसटीची फेरी, नवी 'कॉर्पोरेट शिवनेरी`!

मुंबईमध्ये एसटीची फेरी,  नवी 'कॉर्पोरेट शिवनेरी`!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्याच्या कानाकोप-यात सेवा देणा-या एसटी महामंडळानं आता मुंबईत एसटी सेवा सुरु केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. ` शिवनेरी कॉर्पोरेट` या नावानं ही सेवा सुरु करण्यात आलीय. ही बस कांदिवली ते बीकेसी अशी धावणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवत गुरुवारी सकाळी ` शिवनेरी कॉर्पोरेट ` या एसटीच्या नवीन बस सेवेचे उद्घाटन केलं. कॉर्पोरेट क्षेत्राला आवश्यक त्या सुविधा या बसमध्ये असतील.

कांदिवलीच्या ठाकूर विल्हेजमधून सकाळी 7.20 आणि कांदिवलीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सहून सकाळी 7.30 वाजता ही बस सुटेल. तर संध्याकाळी ठाकूर विल्हेजला जाणारी बस 6.30 वा. आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्सला जाणारी बस 7.15 वाजता सुटणार आहे.

शिवनेरी कॉर्पोरेटमध्ये ` वायफाय `ची सुविधा असेल. यामुळे प्रवास करतांना इंटरनेटचा वापर करता येणार आहे. मोबाईल, लॅपटॉप चार्ज करण्यासाठी चार्जिंगची विशेष सुविधा आहे. एलसीडी टीव्हीसुद्धा या बसमध्ये बसवण्यात आलाय. तसंच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसमध्ये लावण्यात आलेत. जीपीएसची सुविधा बसमध्ये असल्याने बसचा ठावठिकाणा लगेच समजायला मदत होणार आहे. या बससाठी सिंगल तिकीट 140 रुपये एवढं आहे. तसंच एक महिन्याच्या पाससाठी 20 दिवसांचं भाडे आकारलं जाणार आहे.

या सेवेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातले अधिकारी कारऐवजी बसनं प्रवास करतील. यामुळे रस्त्यांवरची कारची संख्या कमी व्हायला मदत होईल. या सेवेला प्रतिसाद मिळाल्यास आणखी जादा शिवनेरी कॉर्पोरेट बस मुंबईच्या वेगवेगळ्या भागांत सुरु केल्या जाणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013, 20:54


comments powered by Disqus