Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:53
www.24taas.com, मुंबईमुंबईमध्ये शौचालयं बांधण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीच शौचालय बांधकामामध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे, असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे.
किरीट सोमय्याच शौचालयांमधील भ्रष्टाचाराचे गुन्हेगार असून त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी भूमिका आव्हाड यांनी घेतली आहे. सोमय्यांनी माफी न मागितल्यास आव्हाड शौचालयांच्या लाभार्थींचा मोर्चा घेऊन जातील असा इशारा सोमय्यांना देण्यात आला आहे. मुंबईत शौचलायं बांधण्याचं काम युवक प्रतिष्ठानला देण्यात आलं होतं. हे प्रतिष्ठान सोमय्या यांचंच असून यात जवळपास २ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे.
शौचालयांचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून अनेक ठिकाणी तर ते पूर्णही झालेलं नाही. माहितीच्या अधिकाराचा वापर करत जितेंद्र आव्हाडांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेतून यासंदर्भातील माहिती मिळवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्यांनी आरोपांची राळ उडवली आहे. त्यामुळेच जितेंद्र आव्हाड किरीट सोमय्यांवर आरोप करत असल्याचं म्हटलं जात आहे.
First Published: Sunday, September 30, 2012, 08:52