Last Updated: Wednesday, October 2, 2013, 23:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईडॉकयार्ड बिल्डिंग दुर्घटनेतील बळींची संख्या 61 वर गेलीय. ही बिल्डिंग धोकादायक आहे, अशी तक्रार इमारतीत राहणा-या अनेकांनी मुंबई महापालिका अधिका-यांकडे केली होती. परंतु गेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिका-यांची त्या तक्रारींची दखल घेतली नाही. या दुर्घटनेची शिकार ठरलेल्या एका मृत रहिवाशाच्या पत्रानेच पालिकेच्या पाषाणहृदयी अधिका-यांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आणलाय...
गेल्या शुक्रवारी डॉकयार्ड रोड भागातील पालिका वसाहतीतील इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली... इमारतीतले लोक सकाळी झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली... अवघ्या काही मिनिटात होत्याचे नव्हते झाले... 61 निरपराध लोकांचे या दुर्घटनेत बळी गेले... बुद्धदत्त कांबळे, वय वर्षे 55 हे त्या दुर्दैवी जीवांपैकी एक... आज बुद्धदत्त कांबळे आपल्यात हयात नाहीत... त्यांच्या घरातील आणखी तिघांचाही या दुर्घटनेत ढिगा-याखाली सापडून मृत्यू झाला. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल, असा धोक्याचा इशारा त्यांनी 21 डिसेंबर 2011 रोजीच दिला होता... मुंबई महापालिकेच्या इमारत दुरूस्ती खात्याच्या असिस्टंट इंजिनिअरला त्यांनी हे पत्र पाठवलं होतं....
डॉकयार्ड इमारत दुर्घटना प्रकरणी शिवडी पोलिसांनी तिघा अधिका-यांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटकही करण्यात आलीय. त्यापैकी पालिकेच्या भायखळा कार्यालयातील बाजार निरीक्षक जमालुद्दीन काझी यांना अटक करण्यासाठी पोलीस जेव्हा त्यांच्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना त्याठिकाणी बुद्धदत्त कांबळेंचं लेटर सापडलं...
पालिका कार्यालयातल्या फायलींच्या ढिगा-यात कांबळेंचं लेटर धूळ खात पडलेलं होतं... कांबळेंच्या पत्रावर पालिका अधिका-यांनी वेळीच कारवाई केली असती, तर कदाचित 61 जीव वाचले असते... निदान आता तरी मुंबई महापालिकेचे निगरगट्ट अधिकारी काहीतरी धडा शिकतील, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 2, 2013, 23:24