Last Updated: Friday, January 31, 2014, 09:16
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई देशातली पहिली आणि बहुप्रतिक्षित मोनो रेल अखेर एक फेब्रुवारीपासून मुंबईत धावणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक फेब्रुवारीला मोनो रेलला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांना आता मोनो रेलमधून प्रवासाची उस्तुकता लागली आहे.
चेंबूर ते वडाळा हा मोनोरेलचा ८.८ किलोमीटरच्या पहिला टप्पा आहे. त्यामुळं ही मोनो रेल चेंबूर ते वडाळा धावणार आहे. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली मोनो रेल मुंबईची शोभा वाढवणार आहे. गेल्या कित्तेक वर्षांपासून सर्वच मुंबईकरांना मोनोरेलची मोठी उत्सुकता लागली होती. त्यामुळं मुंबईकरांची ही उत्कंठा आता एक फेब्रुवारीला संपणार असून मोनोरेल प्रवासासाठी खुली होणार आहे. मोनोरेलमुळं मुंबईतल्या लोकल आणि बेस्टवरचा ताण थोडा कमी होण्यास मदत होणार आहे.
मुळातच वेगानं पळणाऱ्या मुंबईचा वेग आणखी वाढवण्यासाठी मोनो रेल्वे सज्ज झालीय. मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यात वडाळा ते चेंबूर या ८.८ किलोमीटर मार्गावर रेल्वेसेवा सुरू होणार आहे. हा संपूर्ण प्रवास एसी अर्थात वातानुकुलित असणार आहे. वडाळा ते चेंबूर हा प्रवास फक्त वीस मिनिटांत करता येणार आहे. हाच प्रवास इतर मार्गानं करायचा झाला तर ट्रॅफिक गृहित धरता पाऊण तास तरी लागतो. मोनो सुरू झाल्यावर बेस्टच्या बसेसवरचा ताणही कमी होणार आहे.
मोनो रेल्वेचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर राहणार आहे. मोनोमधून प्रवास करणाऱ्या आम आदमीच्या खिशाचा विचारही करण्यात आलाय. म्हणूनच मोनोचं तिकीट कमीत कमी पाच रुपये ते जास्तीत जास्त अकरा रुपये ठेवण्यात आलंय. मलेशियाच्या तंत्रज्ञानाची ही मोनोरेल्वे फक्त एका बीमच्या मदतीनं धावणार आहे. त्यासाठी मोनो चालवणाऱ्या मोनो पायलटसना खास प्रशिक्षण देण्यात आलंय.
मुंबईमध्ये तयार होणारा मोनो रेलचा कॉरिडोर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात लांब कॉरिडोर आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 31, 2014, 09:16