गडकरींची स्वप्न‘पूर्ती’ धोक्यात!, Gadkari’s Purti Group under I-T scanner, again

गडकरींची स्वप्न‘पूर्ती’ धोक्यात!

गडकरींची स्वप्न‘पूर्ती’ धोक्यात!
www.24taas.com, मुंबई

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधित मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तिकर खात्यामार्फत मंगळवारी छापे टाकण्यात आले.

काही महिन्यांपूर्वीच गडकरी यांच्या कंपनीशी संबंधित मुंबई, पुणे, नागपूर व कोलकाता येथील १२ कंपन्यांवर छापे टाकण्यात आले होते. भाजप अध्यक्षपदासाठी बुधवारी निवडणूक होत आहे आणि भाजपचे अध्यक्ष असलेल्या नितीन गडकरींनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. या पार्श्वभूमीवर ‘पूर्ती’छाप्यांसंबंधी विविध तर्क-वितर्कांना उधाण आलंय.

प्राप्तिकर विभागाने पूर्ती समूहावरील गैरव्यवहारांच्या आरोपांच्या चौकशीच्या अनुषंगाने मुंबईत पूर्तीशी संबंधित आठ कंपन्यांवर छापे टाकले व कागदपत्रांची छाननी सुरू केली तर दुसरीकडे चौकशीसाठी सीबीआयचा ससेमीराही पूर्ती समुहाच्या मागे लावण्यात आलाय. भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी यावरून तीव्र शब्दांत काँग्रेसवर हल्ला केलाय. अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीच टाकण्यात आलेले छापे हे काँग्रेसचे कारस्थान आहे. गडकरी आणि भाजपला बदनाम करण्यासाठीच हा डाव आहे. गडकरी यांनी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे आधीच सांगितले आहे. त्यामुळे राजकीय फायदा उठविण्यासाठीच काँग्रेस राजकारण खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजकीय वर्तुळात मात्र गडकरींमागं चौकशीचा हा ससेमिरा भाजपातील अंतर्गत कलहाचा परिणाम असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय.

First Published: Wednesday, January 23, 2013, 09:52


comments powered by Disqus