पाच जणांचे मृतदेह बाहेर, घातपाताची शक्यता - सेना , INS Sindhurakshak tragedy: 5 bodies recovered, survivors unlikely

पाच जणांचे मृतदेह बाहेर, घातपाताची शक्यता - सेना

पाच जणांचे मृतदेह बाहेर, घातपाताची शक्यता - सेना
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

पाणबुडीत अडकलेल्या १८ नौसैनिकांपैकी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. तर सिंधुरक्षक दुर्घटनेमागे घातपात असल्याची शक्यता शिवसेनेनं व्यक्त केलीये.

या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. तसंच संरक्षणमंत्री ए.के. अँटोनी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे.

सिंधुरक्षक पाणबुडीत अडकलेल्या १८ नौसैनिकांपैकी पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. अन्य बेपत्ता नौसैनिकांचा नेव्हीचे डायव्हर्स शोध घेतायत. पाणबुडीत उकळतं पाणी असल्यामुळे त्याच्या आत जाणं अवघड झालंय.

अखंड ३६ तासांच्या प्रयत्नांनंतर पाणबुडीच्या सेकंड कंपार्टमेंटमध्ये शिरणं डायव्हर्सना शक्य झालंय. यातच पाच जणांचे मृतदेह आढळले. या मृतदेहांची अजून ओळख पटलेली नाही. उरलेल्या १३ जणांचा तपास करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

`आयएनएस सिंधुरक्षक`मधील दुर्घटना ही १९७१ च्या पाकिस्तान युद्धानंतर नौदलाचे सर्वांत मोठे नुकसान मानले जात आहे. गेल्या ४० वर्षांतील नौदलाच्या पाणबुडीची ही सर्वांत मोठी दुर्घटना असून, एकाच वेळी १८ नौसैनिकांचा जीव धोक्यात जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येतेय.

`सिंधुरक्षक` ही `किलो क्‍लास` वर्गातील पाणबुडी होती. तत्कालिन सोव्हिएत युनियन आणि त्यानंतर रशियाच्या मदतीने भारताने १९८५ ते २००० दरम्यान त्याची उभारणी केली होती. भारतीय नौदलाकडे अशा दहा पाणबुड्या असून, जर्मन बनावटीच्या एचडीव्हीबोटीही आहेत.

First Published: Saturday, August 17, 2013, 09:04


comments powered by Disqus