Last Updated: Sunday, November 3, 2013, 09:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईनरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी जाहीर इच्छा लतादीदींनी व्यक्त केलीये. काँग्रेसमधून त्यावर प्रतिक्रिया उमटलीये. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे.
मात्र मोदी कंपनीनं व्यावसायिक पद्धतीनं भ्रामक प्रचार-प्रसार चालवलाय. त्यामुळंच लतादिदींची दिशाभूल झाल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. मोदी यांचं विकासाचं ढोंग, धार्मिक असहिष्णुता, गरीब आणि सामान्य माणसाला विकासापासून वंचित ठेवणारं धोरण याबाबतची माहिती लतादीदींकडं लवकरच पाठवणार असून, त्यानंतर लतादीदींचं मतपरिवर्तन होईल, असं काँग्रेसनं प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट केलंय.
याशिवाय, लतादीदींवर देशातल्या प्रत्येक जातीधर्मानं प्रचंड प्रेम केलं असताना, राष्ट्रीय एकात्मतेला धोका असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघपुरस्कृत मोदी यांच्या विचारसरणीशी लतादीदी सहमत असतील, असं अजिबात वाटत नसल्याचा टोला काँग्रेसनं लगावलाय.
तर राष्ट्रवादी काँग्रेसनं लता मंगेशकर यांना टोला हाणलाय. लतादीदींच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “लतादीदी आणि आशा भोसले माणसं बघून वागतात”.
तर लोकशाहीत लतादीदी आणि सामान्य नागरिक या दोघांच्या निवडणुकीतील मताचं मूल्य समान असल्यानं त्यांच्या मोदींबाबतच्या अनुकूल वक्तव्याला फारशी किंमत देण्याची गरज नाही. देशातील कोट्यवधी मुस्लिम, दलित, मागासवर्गीयांना मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान व्हावे, असं वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 3, 2013, 08:50