Last Updated: Wednesday, August 14, 2013, 09:39
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईकाँग्रेस-राष्ट्रवादीचं आगामी लोकसभा निवडणुकीचं घोडं गंगेत न्हालं आहे. आघाडीचा फॉर्म्युला तयार झाला आहे. दोन्ही काँग्रेसच्या लोकसभेच्या जागा वाटत निश्चित झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी २२ तर काँग्रेस २६ जागा लढविणार आहेत. तसा आगामी निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावर दिल्लीतच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यावेळी भास्कर जाधव यांनी काँग्रेसला चिमटा काढला. जागा वाटबाबत राज्यातील काँग्रेस नेत्यांना माहिती नसावी. त्यामुळे जागा वाटबाबत ते आजही बोलत आहेत, असे जाधव यांनी म्हणालेत.
राष्ट्रवादीचे लोकसभेत जास्त खासदार हवे आहेत. कामाला लागा, असा आदेशही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे जाधव यांनी मान्य केले. दरम्यान, आघाडीचे संख्याबळ जास्त असावे, असाही कटाक्ष पवारांचा आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने मनात कोणतीही अडी न ठेवता काम करून लोकसभेतील खासदारांचे संख्याबळ वाढविले पाहिजे, हेही पवारांनी स्पष्ट केल्याचे जाधव यांनी सांगितले.
याआधी झालेल्या दोन निवडणुकांत आघाडी करूनसुद्धा ज्या जादा दोन्ही काँग्रेस आघाडीला जिंकता आल्या नाहीत त्या जागांची अदलाबदल करण्याबाबत समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. तसे संकेत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिलेत. यावेळी जाधव यांनी भाजपला टोला लगावला. अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने शेवटचा प्रयत्न म्हणून नरेंद्र मोदींना पुढे आणले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे जाधव म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची ४१ जणांची जम्बो कार्यकारिणी निवढण्यात आली आहे. यात ९ उपाध्यक्ष, १८ सरचिटणीस, १४ चिटणीसांचा समावेश आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 14, 2013, 09:39