मुंबई मनपात पैशांना फुटले पाय! New scam of Amount of 437 Crores in Mumbai Municipality

मुंबई मनपात पैशांना फुटले पाय!

मुंबई मनपात पैशांना फुटले पाय!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई महापालिकेत विविध खात्यांच्या फायली गायब होण्याचा प्रकार ताजा असतानाच आता थेट खात्यांमध्ये जमा होणारी रक्कमच गायब होण्याचा अजब प्रकार घडलाय. ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ४३७ कोटी इतकी असल्यानं ही प्रकरण गंभीर बनलंय... या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी करण्यात आलीय.

शालेय वस्तू घोटाळा, औषधं खरेदी घोटाळा, कचरा, नालेसफाई, रस्ते दुरुस्ती निविदांच्या रकमेत फेरफार, ९ हजार फाईल्स गायब…हे घोटाळे कमी होते म्हणून की काय आता महापालिकेच्या तिजोरीत असलेल्या पैशांनाही पाय फुटल्याचं दिसतंय. मनसे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी एक नवं प्रकरण उघडकीस आणलंय... देशपांडे यांच्या दाव्यानुसार, तब्बल ४३७ कोटी रुपयांची रोख रक्कम महापालिकेच्या अकाऊंटींग प्रक्रियेतून गायब झालीये... २००८मध्ये करापोटी आलेली ही रक्कम महापालिकेच्या ताळेबंदात कॅश इन हॅण्ड दाखवली जातेय, पण या रकमेचा हिशेब महापालिकेला देता येत नाहीये...

महापालिकेला आपल्या विविध स्त्रोतातून कर रुपात उत्पन्न मिळतं. दररोज मिळणारी रक्कम नियम पद्धतीनुसार त्याच दिवशी बँकेच्या खात्यात जमा करणं बंधनकारक असतं. काही कारणास्तव हे शक्य न झाल्यास दुस-या दिवशी सकाळी तातडीनं ती रक्कम खात्यात जमा करावीच लागते. त्यानंतर विविध कामांसाठी आवश्यकतेनुसार रक्कम काढली जाते.मात्र हे नेहमी घडतं का, याबाबत देशपांडे यांनी शंका उपस्थित केलीये.

महापालिकेतल्या गैरव्यवहारांबाबत विधीमंडळ अधिवेशनातही पडसाद उमटलेत. अकाऊंटीग आणि लेखापरिक्षण पद्धतीवर तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी ताशेरे ओढले होते. त्यामुळे ताळेबंदात एवढ्या मोठ्या रकमेचा घोळ उजेडात येताच महापालिकेची तारांबळ उडली आहे. ही रक्कम नमेकी आहे तरी कुठे? ही त्रुटी की लबाडी याचा शोध आता सुरु झालाय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 13, 2013, 21:24


comments powered by Disqus