राज ठाकरेंवर `सामना`तून जहाल टीका, Raj Thackeray comment on the saamana

राज ठाकरेंवर `सामना`तून जहाल टीका

राज ठाकरेंवर `सामना`तून जहाल टीका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या १२ तारखेच्या आंदोलनाचे स्क्रिप्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलीम-जावेद यांनी लिहलंय, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुझे अटक करो एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत असून त्यालास लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभला आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आलीय. पाहूया या अग्रलेखात नेमकं काय म्हंटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘सलीम-जावेद’ने नाटकाचे स्क्रिप्ट असेच लिहिले आहे. त्यानुसार नायकाला अटक करावीच लागेल. गर्जना हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे व ‘अटक’ हा क्लायमॅक्स आहे! थोडक्यात काय, तर एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत आहे. कारण त्यास लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभला आहे.

लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजल्याने राजकीय रंगमंचावरील हालचाली वाढल्या आहेत व बंद पडलेल्या अनेक नाटक कंपन्यांनाही जाग आली आहे. पडेल नाटकांचे तिसरे व चौथे अंकही गजबजू लागले आहेत. आपल्याकडे राजकारण हेदेखील एक नाटकच आहे. पुन्हा मराठी माणसाला नाटकाचे व राजकारणाचे जबरदस्त व्यसन असल्याने त्याने नाटककला जिवंत ठेवली आहे. पुण्याच्या एस.पी. मैदानावरूनदेखील रविवारी एका जुन्या नाटकाची नव्याने घोषणा झाली. जुन्याच संचात, त्याच नेपथ्यात, त्याच संवादात फक्त ‘नाव’ बदलून हे जुने नाटक रंगमंचावर येत आहे.

मनसेप्रमुखांचे आवडते नाटक ‘मला अटक करा हो!’ रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाले असून विंगेतून अजित पवार, आर. आर. पाटील, पृथ्वीराज बाबा यापैकी एकाने ‘घंटा’ वाजवताच पडदे सरकून नाटकाला सुरुवात होईल. नाटकाचे नेपथ्य हे टोलनाके किंवा रस्ते असल्याने नेपथ्यकारांसही फार तोशीस करावी लागणार नाही. अर्थात नाटक जुनेच असले तरी यावेळी नाटकाच्या नावात ‘नाट्य’ असावे अशी निर्मात्याची खटपट सुरू आहे.

त्यामुळे ‘मला कुणी अटक करील काय?’, ‘आम्ही राडा करतो, तुम्ही अटक करा!’, ‘मला जेलात जाऊ द्या!’, ‘अटक मटक अटकेचे नाटक’, ‘मुझे अटक करो!’, ‘मी अटकराज बोलतोय’, ‘आधी अटक, हळूच सटक’ अशा अनेक नावांवर घोळ सुरू आहे. किंबहुना ही नाटक मंडळी प्रत्येक निवडणुकीच्या आधी या सर्व नावांवर नवे नाटक निर्माण करू शकतील. कारण कथासार, संवाद व कलावंत तयार आहेत. नाटकाच्या शेवटी फक्त नायकास ‘अटक’ करून घेणे गरजेचे आहे. तेवढे झाले आणि ही अटक झाली की कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रेक्षक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करतील व त्याच टाळ्यांच्या गजरात पडदा खाली पडेल.

रविवारी एस.पी. कॉलेजवर ‘मनसे’प्रमुखांनी याच नाटकाचा शुभारंभ केला असून त्या बदल्यात त्यांना बिदागी म्हणून राज्यभर ‘टोल’मुक्त प्रवास मिळणार आहे. शिवाय नाटकाच्या सर्व प्रयोगांची तिकिटे खपविण्याची जबाबदारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने स्वीकारली आहे. ‘मनसे’प्रमुखांनी पुण्यातील सभेत जी संवादफेक केली तो सर्व प्रकार अजबच म्हणावा लागेल. ‘मी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडायला सभा घेतली नाही’, असे ते म्हणाले. मग सभा घ्यायचे प्रयोजन काय?

लोकसभा निवडणुका उद्या किंवा परवा जाहीरच होतील. मग ही सभा काय निवडणुकीआधीचा राजकीय ‘टोल’ वसूल करायला घेतली? ‘टोल’चा मुद्दा साधारण वर्षभरापूर्वी त्यांनी उचललाच होता. प्रत्येक टोलनाक्यावर स्वपक्षाचे लोक वाहने मोजायला बसवले होते. पण हे लोक टोलनाक्यांवरून अचानक गायब झाले. टोलनाके चालूच राहिले व टोलची वसुलीही सुरू राहिली. आता अचानक ‘टोलविरोधा’चा पुळका या मंडळींना पुन्हा आला आहे. मुख्य म्हणजे लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच हा ठसका त्यांना लागला हे महत्त्वाचे. त्यामुळे टोलचे राजकारण हे निवडणुकीच्या फायद्या-तोट्यासाठी आहे हे जनतेला समजले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, February 11, 2014, 09:09


comments powered by Disqus