Last Updated: Wednesday, August 29, 2012, 19:58
www.24taas.com, मुंबईरझा अकादमीच्या कार्यक्रमात मनसेचे आमदार बाळा नांदगावकर सामील झाल्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्चावर टीकास्त्र सोडले आहे. मोर्चा काढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होत असतील, तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे, असा जोरदार हल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ` सामना ` च्या अग्रलेखातून केला आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे जवळ येत असल्याच्या घडामोडींना जोरदार हादरा बसला आहे.
मुंबईत ११ ऑगस्टच्या सीएसटी हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २१ ऑगस्टला मुंबईत महामोर्चा काढला होता. या मोर्चानं मुंबई, महाराष्ट्रासह आसाममधील जनतेची मनं जिंकली होती आणि राज ठाकरे यांची सर्वांकडून कौतुक केले जात होते. यात शिवसेनाही मागे नव्हते. असे मोर्चे व्हायलाच हवेत, असं प्रमाणपत्र शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकलं होतं. तसेच सामनामध्येही पहिल्या पानावर ही बातमी घेण्यात आली होती. पण आज बाळासाहेबांनी बाळा नांदगावकरांना टार्गेट करत मनसेच्या मोर्चाचा अप्रत्यक्ष समाचार घेतला आहे.
ज्या रझा अकादमीनं सीएसटी परिसरात हिंसाचार घडवला ,त्याच अकादमीच्या एका कार्यक्रमामध्ये बाळा नांदगावकर सहभागी झाले होते , असा फोटो २७ ऑगस्टच्या `सामना` त प्रसिद्ध झाला होता. त्यावर बाळासाहेबांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ` दंगलखोरांच्या मांडीला मांडी लावून बसणारे राजकीय पक्ष चार दिवसांनी त्याच दंगलखोरांच्या विरोधात किंकाळ्या मारीत मोर्चे काढतात, हा हिंदूंचा विश्वासघातच नाही काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.
First Published: Wednesday, August 29, 2012, 19:58