कायदेशीरदृष्ट्या निर्दोष `शाहीन` महाराष्ट्र सोडणार, shahin decided to leave maharashtra

कायदेशीरदृष्ट्या निर्दोष `शाहीन` महाराष्ट्र सोडणार!

कायदेशीरदृष्ट्या निर्दोष `शाहीन` महाराष्ट्र सोडणार!
www.24taas.com, मुंबई

फेसबुक वादातून सगळ्यांनाच परिचित झालेली पालघरची शाहीन डाढा हिनं कुटुंबीयांसहित महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतलाय तर शिवसैनिकांनी यावर समाधानच व्यक्त केलंय.

शांतता आणि स्थैर्य मिळावं आणि कदाचित ते आता महाराष्ट्रात मिळणार नाही, म्हणून गुजरातमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शाहीनच्या कुटुंबीयांनी घेतलाय.

१८ नोव्हेंबर रोजी २१ वर्षीय शाहीन डाढा हिनं बाळासाहेब ठाकरेंचं नाव न घेता फेसबूकवर बंदवरून कमेंट पोस्ट केली होती. याच पोस्टला शाहीनची मैत्रिण रेणूनं ‘लाईक’ केलं होतं. शाहीननं केलेल्या पोस्टवर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी दोन्ही मुलींविरुद्ध लोकांच्या भावना भडकावल्याची तक्रार दाखल केली होती. तसंच शाहीनच्या काकांच्या हॉस्पीटलमध्ये घुसून काही लोकांनी तोडफोडही केली होती. त्यानंतर या दोन्ही मुलींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर देशभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा सुरू झाली होती.

राज्य सरकारनं पोलीस अधीक्षकांचं निलंबन आणि मॅजिस्ट्रेटची बदली करून शाहीनला ` क्लीन चिट ` दिलीय तर शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला या मुलींना अटक केलीच कशी? असा जाब विचारला आहे. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या शाहीन निर्दोष ठरलीय. पण, या सर्व प्रकाराचा शाहीन, रेणू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र धसका घेतलाय. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय.

First Published: Friday, November 30, 2012, 14:57


comments powered by Disqus