मुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाहीShiv sena and BJP may fight for CM candidate of Mah

मुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाही

मुख्यमंत्री कोणाचा? शिवसेना-भाजपात एकवाक्यता नाही
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं आज अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असं शिवसेनेनं स्पष्ट केलंय. त्यामुळं भाजपची चांगलीच कोंडी झाली असून, मुख्यमंत्रीबाबत महायुतीच्या बैठकीत निर्णय घेऊ, अशी सावध भूमिका तूर्तास भाजपनं घेतलीय.

महाराष्ट्राचे महाभारत आम्हीच जिंकणार आहोत. आम्ही महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचे वचन आहे. नरेंद्र मोदींच्या रूपाने दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभला. आता महाराष्ट्राच्या मजबुतीचा विडा उचलून शिवसेनेने विजयाचा बेलभंडारा उचलला आहे... आता राज्य शिवसेनेचेच!!!

शिवसेनेच्या 48 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर मुखपत्र `सामना`मधून हा निर्धार जाहीर करण्यात आला. त्यामुळं रंगशारदामध्ये शिबिरासाठी जमलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी त्या वातावरणात आणखी रंग भरला.

`कोण हवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..?` असा सवाल आदित्य ठाकरेंनी रंगशारदाच्या व्यासपीठावरून केला. तेव्हा `उद्धव ठाकरे..` असं एकमुखी उत्तर जमलेल्या शिवसैनिकांनी दिलं... उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, यावर जणू या शिबिरात शिक्कामोर्तबच करण्यात आलं...

रंगशारदामधल्या शिबिरात हे नाट्य रंगत असतानाच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर आणखीच आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महायुतीचं नेतृत्व करत असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेवर येईल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्रीपदाबाबत आता कोणतीही तडजोड नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नेमकी याचवेळी राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश भाजप नेत्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्रीपदाबाबत सेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळं भाजपच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली. मुख्यमंत्री कोण असेल, कोणाचा असेल हे महायुतीच्या बैठकीतच ठरेल, असं भाजप नेते विनोद तावडे यांनी बैठकीनंतर सांगितलं.

याचाच अर्थ शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला देण्याचा विडा शिवसेनेनं उचलला असली तरी, या मुद्यावरून शिवसेना-भाजप महायुतीमध्ये एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालंय. एकीकडे भाजप वाढीव जागा पदरात पाडून घेण्याची व्यूहरचना आखत असताना, शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब करून नवा राजकीय डाव टाकलाय. हा डाव यशस्वी होईल का आणि त्यामुळं सत्तेचा डाव तर विस्कटला जाणार नाही ना. याकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 18:27


comments powered by Disqus