दहावीच्या विद्यार्थ्यांवर डोक्यावर हात मारुन घेण्याची वेळ, SSC student get ready for another chaos

दहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली

दहावीच्या विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बारावी पाठोपाठ आता दहावी परीक्षांच्या हॉल तिकीटांमध्येही गोंधळ होण्याची शक्यता आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे मुख्याध्यापकांमध्येच परीक्षांबाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे.

घरात कुणाचं दहावीचं वर्षं असलं की ते संपूर्ण घरच बदलून जातं. केबल काढली जाते, विद्यार्थ्याच्या अभ्यासाच्या शेड्युलनुसार सगळ्या घराचं वेळापत्रक बदलतं... पण आपण ही बाब जितकी महत्त्वाची मानतो तितकी ती परीक्षा घेणाऱ्या मंडळाला वाटत नाही. ३ मार्चपासून राज्यात एसएससीची लेखी परीक्षा सुरु होतेय. परीक्षा तोंडावर आली असताना अभ्यास करायचं सोडून विद्यार्थी आणि पालकांना नवीच डोकेदुखी सतावण्याची शक्यता आहे.

कारण, हॉलतिकिटांसाठी शाळांना पाठवण्यात येणाऱ्या पूर्व यादीमध्ये असंख्य चुका असल्याचं समोर येतंय. काही शाळांना तर अनोळखी विद्यार्थ्यांची नावं मिळालीत तर काही शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांची नावं यादीतून गायब आहेत. नावात चुका, भलतेच विषय, काहींचे फोटो आणि सही यादीत नाहीच, अशा असंख्य चुकांनी ही यादी खचाखच भरलीय, अशी माहिती बालमोहन विद्यामंदीरचे मुख्याध्यापक विलास परब यांनी दिलीय.

लेखी परीक्षेच्या १५ दिवस आधी तोंडी आणि प्रात्यक्षिकांची परीक्षा असते. मात्र, यासाठी लागणारं साहित्यही बोर्डाकडून अद्याप देण्यात आलेलं नाही. त्यामुळे तोंडी आणि लेखी परीक्षांचं वेळापत्रक शाळा तयार करू शकत नाहीत. पाच-सहाशेपेक्षा जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांवर यामुळे प्रचंड ताण येणार आहे.
 
बोर्डाचा सावळागोंधळ इथंच संपत नाही. यादीतल्या घोळांबाबत मुंबई बोर्डात चौकशी केल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या दिशेनं बोट दाखवलं. बारावीच्या विद्यार्थ्यांना असाच मनस्ताप सहन करावा लागला. पण तेव्हा निदान नोंदणी ऑनलाईन झाल्याचं कारण तरी बोर्डाकडे होतं. आता तर जुन्याच पद्धतीनं नोंदणी होत असूनही घोळ घातले गेल्याचं समोर येतंय. प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या परीक्षांमध्ये महाराष्ट्र बोर्डाला भोपळा मिळाला, तरी आश्चर्य वाटायला नको.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 18:38


comments powered by Disqus