दिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय? - Marathi News 24taas.com

दिल्लीत पेट्रोल होणार स्वस्त, महाराष्ट्राचं काय?

www.24taas.com, मुंबई
 
उत्तराखंड, केरळपाठोपाठ आता दिल्लीतही पेट्रोल स्वस्त होणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पेट्रोलच्या करात कपात करण्याचे संकेत दिलेत. इतर राज्यांना जे जमतं ते महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय. त्यामुळे राज्य सरकार याबाबत काही ठोस निर्णय घेऊन राज्यातल्या जनतेला काही दिलासा देणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.
 
मुंबईत पेट्रोलवर 26 टक्के व्हॅट आणि 1 रुपया सरचार्ज आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात 25 टक्के व्हॅट आणि 1 रुपया सरचार्ज आहे. त्यामुळं व्हॅटमध्ये सवलत देऊन गोवा, उत्तराखंड, यासारख्या राज्यांनी पेट्रोलची दरवाढ होऊ दिली नाही. उत्तराखंड आणि केरळ सरकारने सेस कमी केल्याने तिथं पेट्रोलचे दर प्रत्येकी 1 रुपया 87 पैसे आणि 1 रुपया 63 पैशांनी कमी होणार आहेत. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशाच प्रकारचा काही निर्णय घेऊन राज्यातल्या जनतेवर लादलेली दरवाढ कमी करेल, अशी आशा सर्वसामान्य जनतेला वाटतेय.
 
आधीच दुष्काळाच्या झळा, त्यात दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि आता पेट्रोलची झालेली दरवाढ यामुळं सर्वसामान्यांचं जीणं मुश्किल झालंय. त्यामुळे पेट्रोलदरवाढीवर राज्य सरकार काय निर्णय घेतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

First Published: Friday, May 25, 2012, 16:45


comments powered by Disqus