डॉ. आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलवर चढाई - Marathi News 24taas.com

डॉ. आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलवर चढाई

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागणीला  राजकारण्यांनी वाटाण्याच्या अक्षता दिल्यानंतर अखेर आंदोलकांनी आज इंदू मिलवर जोरदार चढाई केली. हजारे समर्थक स्मारकाच्या मागणीसाठी आक्रमक झालेत. पोलिसांच्या विरोधाची पर्वा न करता आंदोलकांनी ही चढाई केली.
 
इंदू मिलच्या गेटवर चढून आंदोलकांनी मिलचा ताबा घेतला. आंदोलकांच्या पवित्र्यामुळे  पोलिसांनीही बघ्यांची भूमिका घेतली. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची जागा देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे हजारो आंदोलक आज रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आंनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हजारो आंदोलक गौतम बुद्ध आणि आंबेडकरांच्या पुतळ्यासह इंदू मिलमध्ये घुसले. या आंदोलकांनी इंदू मिलमध्येच गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
 
स्मारकाबाबत सरकारकडून ठोस कृती केली जात नाही तोपर्यंत या जागेचा ताबा न सोडण्याचा निर्धार आंदोलकांनी केलाय. आतापर्यंत राज्य सरकारनं केवळ आश्वासनं दिलेली आहेत मात्र कृती काहीच झालेली नसल्यानं या आंदोलकांच्या भावनेचा उद्रेक झालाय. गेल्या अनेक वर्षांपासून इंदू मिलच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र आज सहा डिसेंबर या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन कार्यकर्ते हा प्रश्न लावून धरणार आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून रॅपिड एक्शन फोर्सच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
 
आंबेडकरी जनतेनं इंदू मिलवर ताबा घेतला असला तरी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळीच भूमिका घेतली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची जागा द्यावी अशी राज्य शासनाची भूमिका आहे. या संदर्भात राज्य सरकारनं प्रस्ताव केंद्र शासनाकडं पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये. इंदू मिलची जागा केंद्र सरकारच्या मालकीची असल्यानं केंद्र सरकार जागेबाबत निर्णय घेईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलयं.
 
 
 

First Published: Tuesday, December 6, 2011, 12:11


comments powered by Disqus