Last Updated: Tuesday, June 12, 2012, 21:33
www.24taas.com,मुंबई दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांची लगबग सुरु होते ती चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी.. मुंबईत ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक चांगला पर्याय आहे तो नव्याने सुरु झालेल्या घनश्याम जालान कॉलेजचा.. या कॉलेजचं उद्घाटन रविवारी एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा आणि मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते झालं.
मुंबईतील मालाडमध्ये नव्यानं सुरु झालेलं घनश्यामदास जालान कॉलेज अकरावीला विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत प्रवेस घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी एक खूप चांगला पर्याय आहे. अखिल भारतीय मारवाडी अग्रवाल समाजातर्फे सुरु करण्यात आलेल्या या कॉलेजची सात मजली इमारत संपूर्ण एअर कंडीशन्ड आहे. या कॉलेजमध्ये आधुनिक उपकरणाने सुसज्ज अशी प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, जिम आणि लायब्ररी अशा सुविधाही आहेत. या कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण दिलं जाईल आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे डोनेशन न घेता अतिशय वाजवी शुल्क घेऊन इथे प्रवेश दिला जाणार आहे.
कॉलेजच्या उद्घाटनप्रसंगी एस्सेल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्रा यांनी शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल ट्रस्टचं कौतुक केलं. तसंच कॉलेजमध्ये मौलिक शिक्षण मिळावं ही अपेक्षा व्यक्त केली. शाळा आणि ज्युनिअर कॉलेजनंतर लवकरच पदवीपर्यंत कॉलेज सुरु करण्याचा ट्रस्टचा मानस आहे.
First Published: Tuesday, June 12, 2012, 21:33