अण्णांच्या टोपीत गांधी नाही - ठाकरे - Marathi News 24taas.com

अण्णांच्या टोपीत गांधी नाही - ठाकरे

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
टीम अण्णांमधील लोकांना जे हवे आहे, तेच अण्णांकडून वदवून घेतले जात असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून संपादक बाळासाहेब ठाकरे यांनी केलीय.
 
महाराष्ट्राच्या नेत्यांवर हल्ला करून त्यांचा अवमान करणारे राज्याचे दुश्मनच मानायला हवेत, या शब्दात अण्णांनी शरद पवारांवरील केलेल्या हल्ल्याच्या समर्थनावर आसूड ओढण्यात आलाय. समाजहितासाठी हिंसाचार समर्थनीय असल्याचं सांगत अण्णांनी गांधीवादाचा कोथळाच काढल्याचा टोला अग्रलेखात लगावण्यात आलाय. अण्णांना काही लोकांनी गांधी किंवा महात्मा ठरवण्याचा जो खटाटोप केलाय तो व्यर्थ आहे.' हजारेंच्या डोक्यावर फक्त टोपी आहे. पण त्या टोपीत गांधी नाही, अशा शब्दात अण्णांवर हल्ला चढवण्यात आलाय.
 
'जो न्याय पवारांना तोच न्याय चिदंबरम यांना का नाही ?' असा सवालही इथं उपस्थित करण्यात आलाय. अण्णांच्या भोवताली असलेल्या बजबजपूरीला जे हवं ते त्यांच्याकडून वदवून घेतलं जातं. 'म्हणजे कंबर अण्णांची व धोतर दुस-यांचे. हा गांधावाद कसला', अशा तिखट शब्दात सामनाच्या अग्रलेखातून अण्णा आणि त्यांच्या टीमला फटकारण्यात आलंय.

First Published: Friday, December 9, 2011, 05:52


comments powered by Disqus