Last Updated: Friday, July 20, 2012, 17:46
www.24taas.com, मुंबई अचानक २०० मोटरमन रजेवर गेल्यामुळे सगळ्यांचीच भंबेरी उडालीय. जेव्हा जेव्हा रेल्वेचा खोळंबा होतो तेव्हा तेव्हा 'बेस्ट' प्रवाशांच्या मदतीला धावून येते. पण, आज काहीही पूर्व कल्पना न देता सामूहिक रजेवर गेलेल्या मोटरमन्समुळे बेस्ट प्रशासनाचीही धांदल उडालीय. तरीही जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.
आत्तापर्यंत बेस्टकडूननं १५ ज्यादा बसेस सोडल्या गेल्यात. माहिम, अंधेरी, सांताक्रूझ या भागांत या बसेस सोडण्यात आल्यात. एसटी महामंडळाकडूनही ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी काही खाजगी गाड्यांची मदत घेण्याचाही विचार बेस्ट आणि एसटी महामंडळामध्ये सुरू आहे. रेल्वे स्टेशनवर गर्दी ओसंडून वाहत असल्यामुळे प्रवाशांनी रस्त्यारस्यांवरही गर्दी केलीय. त्यामुळे या ज्यादा बसेसही कमी पडण्याची शक्यता आहे.
शुक्रवारचा दिवस असल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या गर्दीत आढळून येत आहेत. महिला, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांचाही या घटनेमुळे खोळंबा झालाय. रेल्वे मोटरमन्सनं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना वेठीला धरल्यामुळे नागरिकांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. बऱ्याच वेळ स्टेशनवर उभं राहूनही गाडीचा काही पत्ता नाही, रेल्वे अधिकाऱ्यांना काही विचारलं तर योग्य माहिती मिळत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केलीय. कामावरून घरी परतणाऱ्यांची एकच तारांबळ उडालीय. ही परिस्थिती कधीपर्यंत कंट्रोलमध्ये येईल, याबद्दल मात्र अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे.
.
First Published: Friday, July 20, 2012, 17:46