Last Updated: Thursday, August 9, 2012, 05:06
www.24taas.com, मुंबई आजच्या ‘सामना’मधून बाळासाहेबांनी टीम अण्णांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. ‘भूत उतरले’ अशा नावाचाच अग्रलेख लिहून त्यात टीम अण्णांची बरखास्ती म्हणजे जनतेच्या मानगुटीवर बसलेलं भूतच उतरलं असल्याची भावना सामनामध्ये व्यक्त केली आहे.
टीम अण्णांच्या चळवळीला यात वळवळ म्हटलं आहे. टीम अण्णा खुद्द अण्णांच्याही गळ्यातला फास बनत चालल्याची टीका यात बाळासाहेबांनी केली आहे. टीम अण्णांच्या आंदोलनामुळे देशाला कुठलाही फायदा झाला नाही. उलट, टीम अण्णा ही देशासाठी ठरलेली डोकेदुखीच होती असं या अग्रलेखात लिहिलं आहे. टीम अण्णा बरखास्त केल्यामुळे जनतेची डोकेदुखी गेली असं विधान बाळासाहेबांनी केलं आहे. जनतेच्या थोड्या प्रतिसादानेच टीम अण्णांच्या डोक्यात हवा गेली आणि त्यांनी राजकारण्यांना शिव्या घालण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू केला होता. मात्र, जनतेला आता टीम अण्णांच्या फोलपणाची जाणीव झाल्यामुळे दिल्लीमध्ये यंदा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. म्हणूनच अण्णांनी टीम अण्णा बरखास्त केली आहे. अशा आशयाचं लिखाण बाळासाहेबांनी केलं आहे.
टीम अण्णांच्या सदस्यांची बेबंद बकबक जनतेसाठी तापदायक ठरली होती. ही टीम अण्णां अण्णांनी आधीच बरखास्त केली असती, तर दिल्लीला झालेला फियास्को झाला नसता, असा टोलाही ठाकरेंनी लगावला आहे. टीम अण्णा पुन्हा कुठल्या रुपात जनतेच्या मानगुटीवर बसेल, याचा नेम नाही. मात्र पुन्हा संविधानाला धोका निर्माण होऊ नये असं मत बाळासाहेबांनी व्यक्त केलं आहे.
First Published: Thursday, August 9, 2012, 05:06