Last Updated: Friday, December 23, 2011, 13:46
झी २४ तास वेब टीम, मुंबई मुंबईत उपोषणाला जागा दिली नाही तर जेलमध्ये उपोषणाला बसणार असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिलाय. सरकार हेतूपुरस्सर उपोषणाच्या मार्गात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय.
सरकारनं सादर केलेलं लोकपाल बिल कुचकामी असल्याचं सांगत सरकारी लोकपालावर जनमत घेण्याची मागणी अण्णांनी केलीय. लालू प्रसाद यादव यांनाही अण्णांनी टीकेचं लक्ष्य केलं. लालू हे चारा घोटाळा विसरले का असा खोचक सवाल अण्णांनी केलाय.
अण्णा हजारेंचं मुंबईतलं आंदोलन आता आणखी हायटेक होणार आहे. अण्णांच्या उपोषणानंतर ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत देशभरात जेलभरो आंदोलन होणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाव नोंदवणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी आता ऑनलाईन नाव नोंदणीला सुरुवात झालीय.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणासाठी राज्य सरकारनं मुंबईत जागा द्यावी या टीम अण्णांच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. अण्णांच्या उपोषणाचं ठिकाण अजूनही निश्चित झालेलं नाही. आझाद मैदानात उपोषण करण्यासाठी वेळेचं बंधन घालण्यात आलंय. तर एमएमआरडीए मैदानासाठी लाखो रुपये भाड्याची मागणी करण्यात आलीय. याविरोधात टीम अण्णा हायकोर्टात गेलीय. २७ ते २९ डिसेंबर दरम्यान अण्णांचं उपोषण होतंय. मात्र त्यासाठी जागा अजून ठरलेली नाही.
या आंदोलनासाठी एमएमआरडीए किंवा आझाद मैदान मिळवण्याचे प्रयत्न टीम अण्णांकडून सुरु आहेत.मात्र वेगवेगळ्या नियमांच्या कचाट्यात अडकवून आंदोलन होऊ नये यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप टीम अण्णांकडून करण्यात आलाय. त्यामुळं मैदान मिळवण्यासाठी टीम अण्णांने हायकोर्टात धाव घेतलीय.
यावर आज कोर्टात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी अण्णांचे उपोषण आझाद मैदानावर होईल असं गाझियाबादमध्ये जाहीर केलंय.
First Published: Friday, December 23, 2011, 13:46