Last Updated: Thursday, January 5, 2012, 17:30
www.24taas.com वेब टीम, मुंबई

शिवसेना, भाजप आणि रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांच्या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सेना आणि भाजपाने आठवलेंच्या रिपाईला २५ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर रामदास आठवलेंनी ३० जागांची मागणी केली आहे.
आठवलेंनी झी २४ तास सोबत बोलताना सांगितलं की आम्ही सेना-भाजपचे नगरसेवक ज्या जागांवर निवडून आले आहेत त्याची मागणी केलेली नाही. पण जिथे आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे ते प्रभाग मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे. एक प्रकारे रिपाईची ताकद असलेले प्रभाग मिळत नसल्याबद्दल आठवलेंनी खंत व्यक्त केली आहे.
थोड्याच वेळात सेना भवनात शिवसेना, भाजप आणि रिपाई पक्ष कार्यकारिणी सदस्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेनेने १६ प्रभाग रिपाईला सोडण्याची तयारी दाखवली असली तरी त्या प्रभागांमधील सेने पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. तरीही या बैठकीत सामोपचाराने तोडगा निघण्याची शक्यता आहे.
First Published: Thursday, January 5, 2012, 17:30