Last Updated: Thursday, January 5, 2012, 19:39
www.24taas.com, मुंबई
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २५ जागा देण्यावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असून याबाबत रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिवसेना भवन येथे महायुतीची जागा वाटपासंदर्भात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, आणि आरपीआयचे रामदास आठवले उपस्थित होते. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.
मुंबई महापालिकेत महायुती झाल्यानंतर आरपीआयने ३० जागांची मागणी केली होती. परंतु, आज झालेल्या बैठकीत आरपीआयला २५ जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत रामदास आठवले यांना विचारले असता, आम्ही ३० जागा मागितल्या होत्या, परंतु, २५ जागा मिळाल्या त्यात आम्ही समाधानी आहोत.
तसेच, नामदेव ढसाळ यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही, त्याबाबत बोलताना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नामदेव ढसाळ हे आमचे मित्र आहे. आज झालेल्या प्रकाराबद्दल त्यांची समजूत काढली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
First Published: Thursday, January 5, 2012, 19:39