'दर्पण' मीडिया क्लबची स्थापना - Marathi News 24taas.com

'दर्पण' मीडिया क्लबची स्थापना

www.24taas.com, मुंबई 
 
मराठीत पत्रसृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंती  निमित्त विलेपार्लेच्या साठ्ये महाविद्यालयाने मीडिया क्लबची स्थापना केली. साठ्ये महाविद्यालयात आयोजित शानदार कार्यक्रमाला महाराष्ट्र टाइम्सचे प्रमुख संपादक अशोक पानवलकर, झी २४ तास वृत्त वाहिनीचे  संपादक मंदार परब, माध्यम तज्ञ संजीव लाटकर आणि पटकथा लेखिका अपर्णा पाडगावकर  आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
साठ्ये कॉलेजने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील बॅचलर ऑफ मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केलं होतं. त्यामुळेच विरारच्या विवा महाविद्यालय, घाटकोपरच्या सोमैय्या महाविद्यालय, ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
 
पत्रकारिता आणि मनोरंजनाच्या क्षेत्रातील दिग्गजांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी हरखून गेले होते. विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांमध्ये प्रश्नोत्तरांमुळे संवाद चांगलाच रंगला. मीडिया क्लबच्या माध्यमातून सर्वच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी सहाय्य तसंच मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसंच पत्रकारितेला पूरक अशा छोट्या कालावधींचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचं समन्वयक गजेंद्र देवडा यांनी सांगितलं.
 
 
 

First Published: Friday, January 6, 2012, 18:01


comments powered by Disqus