महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम - Marathi News 24taas.com

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम

www.24taas.com
 
रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत जागा वाटपा संदर्भात निर्णय झाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा ढसाळांनी दिला आहे.  रामदास आठवले यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं कि नामदेव ढसाळ यांच्याकडे चांगले उमेदवार असल्यास त्यांचा जरुर विचार करण्यात येईल.
 
दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.
 
मागच्या आठवड्यात जागा वाटपासंदर्भात सेना भवनात महत्वपूर्ण बैठक झाली होती. कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरुन दलित पँथरचे संस्थापक नामदेव ढसाळ बैठकीला हजेरी न लावताच परतले होते. आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया ढसाळांनी त्यावेळेस व्यक्त केली होती.
 
 

First Published: Monday, January 9, 2012, 12:36


comments powered by Disqus