राष्ट्रवादीने स्वबळावर खुशाल लढावे - माणिकराव - Marathi News 24taas.com

राष्ट्रवादीने स्वबळावर खुशाल लढावे - माणिकराव

www.24taas.com, मुंबई
राष्ट्रवादीला स्वबळावर लढायचे असले तर लढावे, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे. आज सायंकाळपर्यंत काँग्रेसशी युती झाली नाही तर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असा अल्टीमेटम राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यावर माणिकरावांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
मुंबईतील काँग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडी संदर्भात आज सायंकाळी दोन्ही पक्षात बैठक होणार असून या बाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आघाडी होऊ नये, असे गुरूदास कामत यांचं मत नाही, असे माणिकरावांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला गेले असून ते मुंबईत आल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
 
दरम्यान, पवारांचा अल्टीमेटम हा काँग्रेसला नाही, तर त्यांच्या नेत्यांना असल्याचे माणिकरावांनी स्पष्ट केले आहे.  मुंबईत राष्ट्रवादीला ४५ पेक्षा अधिक जागा देण्यास काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी विरोध दर्शविला आहे. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नसताना त्यांची ६५ जागांची मागणी अव्वाच्या सव्वा असल्याचं मत काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, पवारांचा अल्टीमेटम काँग्रेसला नसल्याचे माणिकराव जरी म्हणत असले तरी, पवारांनी काँग्रेसला आघाडीच्या जागांबाबत निर्णय घेण्याचा आज सायंकाळपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. आघाडीबाबत आमची भूमिका लवचिक आहे. प्रश्न सामोपचाराने सुटला पाहिजे, शेवटपर्यंत थांबून सर्वांचे नुकसान होईल, असे मत पवारांनी व्यक्त केलं आहे.  
 

 

First Published: Monday, January 9, 2012, 18:12


comments powered by Disqus