मुंबई आमच्या बापाचीः अबू आझमी - Marathi News 24taas.com

मुंबई आमच्या बापाचीः अबू आझमी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
खासदार संजय निरुपम पाठोपाठ अबू आझमी आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी छट पूजेचे निमित्त करुन राजकारण सुरू केले आहे. ‘मुंबई हमरे बापकी है, यहाँ छाती ठोक के रहेंगे, कोई मारपीट करेगा तो वन बाय वन निपट लेंगे ’अशा शब्दात समाजवादी नेता अबू आझमी याने शिवसेना आणि मनसेला उघड-उघड आव्हान दिले आहे.
 
उत्तर भारतीय हाच मुंबईचा कष्टकरी समाज आहे. त्यांनी विश्रांतीसाठी घरी बसायचं ठरवलं तर मुंबई बंद पडेल, असे संजय निरुपम नागपूर येथील भाषणात म्हणाले होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कृपाशंकर सिंह यांनीही उत्तर भारतीय रिक्षा-टॅक्सी चालवतात. त्यांनी मनात आणलं मुंबईत कोणालीही रिक्षा-टॅक्सी सेवा उपलब्ध होणार नाही, असे सांगितले.
 
छट पूजेच्या निमित्ताने काल (मंगळवारी) मुंबईत ठिकठिकाणी उत्तर भारतीयांचे मेळावे झाले. अशाच मेळाव्यांदरम्यान उत्तर भारतीयांना संबोधित करताना कृपाशंकर सिंह आणि अबू आझमीने मुंबईवर हक्क दाखवायला सुरुवात केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून छट पूजेच्या निमित्ताने होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला परवानगी दिली जाते. मात्र मेळाव्याच्या व्यासपीठाचा उपयोग कृपाशंकर आणि अबूने राजकारणासाठीच केला. आम्हाला भारतात कुठेही राहण्याचा हक्क आहे. या हक्काचा उपयोग करुन आम्ही कुठेही राहू. बिनधास्त आपल्या मर्जीनुसार राहू. कोणी पंगा घेतलाच तर बघून घेऊ, असे ते म्हणाले.
उद्धव आणि राजचे नाव न घेता हिंमत असेल तर बिहारच्या रस्त्यांवरुन फिरुन दाखवा. उत्तर प्रदेशमध्ये येऊन दाखवा. आम्ही जसे युपी-बिहारमध्ये राहतो तसेच मुंबईतही राहणार, असे वक्तव्य अबू आझमी याने केले. याआधी निरुपम यांनी उद्धव, राज आणि आदित्य या ठाकरे कुटुंबातील सदस्यांना संरक्षणाशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर फिरुन दाखवा, असे आव्हान दिले होते.
 

First Published: Wednesday, November 2, 2011, 13:03


comments powered by Disqus